ऑनलाईन टीम / पुणे :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पुणे महानगरातील प्रशिक्षित स्वयंसेवक, कार्यकर्ते 540 वस्त्यांमधील 394 आपात्कालीन मदत केंद्राच्या माध्यमातून मदत कार्यात सक्रिय झाले आहेत. आपदा केंद्रांमधून सुमारे दोन हजारांहून अधिक संघाचे प्रशिक्षित स्वयंसेवक,कार्यकर्ते सहभागी झाले असून त्यांचे संपूर्ण नियोजन ऑनलाइन बैठकांद्वारे होते आहे.
बेघर, असंघटित क्षेत्रातील कामगार अशांच्या भोजनाची व्यवस्था करणे, स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, एकटे रहाणारे ज्येष्ठ नागरिक यांच्यापर्यंत जेवणाचे डबे, औषधी पुरविणे, गरजू कुटुंबांना शिधावाटप या व अशा विविध गोंष्टीवर लक्ष्य केंद्रीत करण्यात येत आहे.
दुसरीकडे शाखा व ‘बालगोकुलम’ या व यासारख्या उपक्रमा अंतर्गत ४ ते १२ वयोगटातील मुलांसाठी घरातच ऑनलाइन सेशन्सची व्यवस्था करण्यात आली आहे. ज्यात प्रश्नमंजुषा, चित्रकला स्पर्धा, देशभक्ती गीत पाठांतर स्पर्धा, सुभाषित पाठांतर स्पर्धा, सुर्यनमस्कार, योग प्रात्यक्षिके व स्पर्धा, विज्ञान कथांचे वाचन असे वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत.
आठ हजार रक्तपिशवी संकलित करण्याचे लक्ष्य
राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व जनकल्याण रक्तपेढी यांच्या संयुक्त प्रयत्नातून पुणे महानगराच्या सर्व भागातून रक्तदानासाठी मोठे रक्तसंकलन अभियान हाती घेण्यात आले आहे. त्यानुसार जून 2020 पर्यंत अंदाजे आठ हजार रक्तपिशवी संकलित करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. 1 मार्च ते 31 मार्च दरम्यान अकराशेहून अधिक रक्तपिशवी संकलित झाल्या आहेत.
गरजू कुटुंबांना आवश्यक किराणा साहित्याचे वाटप
पुणे शहरात लॉकडाउन झाल्याने अनेक गोरगरीब कुटुंबे, मजूर, हातावरचे पोट असणाऱ्या कुटुंबांचा उदरनिर्वाह अवघड होऊन बसला आहे. अशा गरजू कुटुंबांना रा. स्व. संघ. कसबा भाग आणि स्व-रुपवर्धिनी पुणे यांच्या वतीने जीवनावश्यक किराणा सामानाचे वाटप करण्यात येत आहे. .