ऑनलाईन टीम / पुणे :
महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यातच पुणे शहरात चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे शहरात आणि जिल्ह्यात पुन्हा एकदा 14 ते 23 जुलै या कालावधीत लॉक डाऊन जारी करण्यात आला आहे.
मात्र, लॉक डाऊन सुरू झाल्यावर केवळ 7 दिवसात म्हणजेच 14 ते 19 जुलैमध्ये सर्वाधिक म्हणजेच 11 हजार 577 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 245 जणांनी आपला जीव गमावला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काल दिवसभरात 2459 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या 51 हजार 412 वर पोहोचली आहे. तर रविवारी पुणे जिल्ह्यात सर्वाधिक 61 मृत्यूंची नोंद झाली. यामध्ये पुणे शहरातील 38, पिंपरी चिंचवड मधील 14, पुणे ग्रामीण मधील 4, नगरपालिका क्षेत्रातील 4 आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डातील एका मृत्यूचा समावेश आहे.
दरम्यान, पुण्यासह पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मृतांची संख्या तेराशेहून अधिक झाली आहे. शहरात 557 रुग्ण अधिक असून, त्यापैकी 94 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. तर 463 रुग्णांना ऑक्सीजनवर ठेवले आहे. 730 रुग्णांना बरे झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला असून, आतापर्यंत 22,611 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सद्य स्थितीत 13,799 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.