ऑनलाईन टीम / पुणे :
पुणे शहरातील 81 उद्याने तसेच बागा येत्या 1 नोव्हेंबरपासून उघडण्यास महापालिकेकडून परवानगी देण्यात आली आहे. यानुसार आता पुण्यातील उद्याने आणि बागा सकाळी 6 ते 8 आणि सायंकाळी 5 ते 8 या वेळेत खुली केली जाणार आहेत.
शहरातील बागा, उद्याने उघडण्यात यावी यासाठी नागरिकांकडून मागणी केली जात होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. मात्र, यासाठी काही नियमांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक असणार आहे.
उद्याने, बागा खुली करण्यास परवानगी दिली असली तरी, दिवाळी पाडव्या सारखे कार्यक्रम उद्यानात साजरे करण्यास मनाई असणार आहे, असेही महापालिकेने यावेळी स्पष्ट केले आहे. तसेच उद्यानात सुरक्षित अंतर ठेवूनच जॉगिंग आणि चालण्याचे व्यायाम करता येणार आहेत.
यासोबतच बागा, उद्यानांमध्ये दहा वर्षाखालील मुले तसेच 65 वर्षांवरील व्यक्ती, गरोदर महिला यांना प्रवेश नाकारण्यात आला आहे.
- उद्याने, बागांसाठी नियम :
- मास्क चा वापर बंधनकारक.
- सुरक्षित अंतर ठेऊन धावणे, चालणे यासारख्याच वैयक्तिक व्यायामांनाच परवानगी.
- जिम साहित्य, हिरवळ, बेंचचा वापर करण्यास मनाई.
- हास्यक्लब, योगा, शूटिंग, दिवाळीपहाट यासह अन्य सार्वजनिक कार्यक्रमांना परवानगी नाही.