रशियाच्या न्यायालयाचा निर्णय : 1100 समर्थकांनाही अटक
वृत्तसंस्था / मॉस्को
रशियातील विरोधी पक्षाचे नेते अलेक्सी नवाल्नी यांना तेथील न्यायालयाने अडीच वर्षांचा तुरुंगवास ठोठावला आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी दोषी ठरल्यावरही त्यांनी साडेतीन वर्षांच्या स्वतःच्या निलंबित शिक्षेच्या अटींचे उल्लंघन केल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर अलेक्सी समर्थक रस्त्यांवर उतरले आहेत. यादरम्यान पोलिसांनी 1100 हून अधिक जणांना ताब्यात घेतले आहे.
44 वर्षीय नवाल्नी हे रशियातील भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाचे चेहरे आहेत. त्यांनी 2018 मध्ये राष्ट्रपती निवडणुकीत भाग घेण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांना एका आरोपात दोषी ठरवून निवडणूक लढविण्यापासून रोखण्यात आले होते. 20 ऑगस्ट रोजी नोविचोक विष देण्यात आल्यापासून ते जर्मनीत स्वतःवर उपचार करवून घेत हेते.
रशियात निदर्शने
रशियात राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांचे कट्टर विरोधक असलेल्या नवाल्नी यांच्या अटकेच्या विरोधात देशभरात निदर्शने होत आहेत. पुतीन यांच्या विरोधात रशियातील हे आतापर्यंतचे सर्वात मोठे आंदोलन असल्याचा दावा केला जात आहे. पण पुतीन यांनीही आता अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे.
जर्मनीतून परतताच अटक नवाल्नी जर्मनीतून 17 जानेवारी रोजी मॉस्को येथे परतले होते, विमानतळावरच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. यापूर्वी नवाल्नी यांनी काही चित्रफिती प्रसारित करत पुतीन यांच्या मालकीचा आलिशान महाल असल्याचा आरोप केला होता. पुतीन हे महिलांवर शासकीय निधी उधळत असल्याचेही नवाल्नी यांनी म्हटले होते.