युक्रेनवर हल्ला गुन्हा असल्याचे रशियाच्या वैमानिकाचे वक्तव्य
स्वतःच्या देशामुळे शरमेने मान खाली गेली : रशियन पत्रकार
युक्रेनवर हल्ल्यानंतर ब्लादिमीर पुतीन यांना रशियातील नागरिकांच्या नाराजीलाच तोंड द्यावे लागतेय. रशियात लोक युद्धाच्या विरोधात निदर्शने करत आहेत. याचदरम्यान एका रशियन वैमानिकाने युक्रेनवरील स्वतःच्या देशाच्या हल्ल्याची निंदा केली आहे.
याचा व्हिडिओ समोर आला आहे. युक्रेनमध्ये युद्ध हा गुन्हा आहे. समजुतदार लोक माझ्याशी सहमत होतील आणि हे युद्ध रोखण्यासाठी सर्वकाही करतील असे वाटत असल्याचे या वैमानिकाने यात म्हटले आहे. युक्रेनचे राजदूत ओलेक्सेंडर शेरबा यांच्यानुसार हा वैमानिक रशियन एअरलाइन एअरोफ्लोटची सहाय्यक कंपनी पोबेडाचा कर्मचारी आहे. वैमानिकाने तुर्कस्तानच्या अंताल्यामध्ये पोहोचल्यावर प्रवाशांना हा संदेश दिला.
रशियाच्या पत्रकार येवजिनिया अल्बात्स यांनीही या हल्ल्याची निंदा केली आहे. मी जो कर भरते, त्यातून बॉम्ब तयार केले जातात आणि हे बॉम्ब युक्रेनमध्ये पाडविले जात आहेत. माझा देश युक्रेनच्या लोकांसोबत असे करत असल्याने मी माफी मागते असे त्यांनी म्हटले आहे.
रशियाची राजधानी मॉस्को, सेंट पीटर्सबर्ग आणि अन्य शहरांमध्ये लोक रस्त्यांवर उतरून युद्धविरोधी घोषणाबाजी करत आहेत. रशियात युक्रेनवरील हल्ल्याची निंदा करणारे खुले पत्रही जारी करण्यात आले. रशियासह जपान, हंगेरी, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया समवेत अनेक देशांचे लोक या युद्धाची कठोर शब्दांमध्ये निंदा करत आहेत. तसेच रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांना हे युद्ध रोखण्याचे आवाहन करत आहेत. रशियाच्या 37 शहरांमध्ये रविवारी निदर्शने झाली. यादरम्यान पोलिसांनी 800 हून अधिक लोकांना ताब्यात घेण्यात आले.
जर्मनीची राजधानी बर्लिनमध्ये पुन्हा एकदा रशियाच्या विरोधात मोठी निदर्शने झाली आहेत. रविवारी 30 हजारांहून अधिक लोक हातात युक्रेनचा झेंडा घेऊन यात सामील झाले. शीतयुद्धाच्या काळातील विभाजित जर्मनीचे प्रतीक ब्रँडेनबर्ग गेटनजीक हे लोक एकत्र झाले.