कीव्हवर कब्जा न करता आल्याने बिथरले ः क्रामटोर्स्कमध्ये क्षेपणास्त्र हल्ला करणाऱया जनरलला सोपविली जबाबदारी
रशिया-युक्रेन युद्धाला आता दीड महिन्यांपासून अधिक काळ झाला आहे. दोन्ही देशांमधील संघर्ष अद्याप सुरू असून यावर कुठलाच तोडगा निघू शकलेला नाही. याचदरम्यान रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनमध्ये युद्धाचे नेत्त्व करण्यासाठी नवे सैन्य जनरल अलेक्झेंडर ड्वोर्निकोव्ह यांना नियुक्त केले आहे. रशियाच्या सैन्याला दीड महिन्यांपेक्षा अधिक काळानंतरही कीव्हवर कब्जा न करता आल्याने पुतीन अस्वस्थ असल्याचे मानले जात आहे.
क्रामस्टोर्क येथील रेल्वेस्थानकारव क्षेपणास्त्र हल्ल्याचा आदेश जनरल ड्वोर्निकोव्ह यांनीच दिला होता. ड्वोर्निकोव्ह यांना आक्रमक जनरल मानले जाते. आता युक्रेनमधील सैन्य मोहिमांचे नेतृत्व ते करणार आहेत. रशियाने युक्रेनमध्ये तिन्ही संरक्षण दलांदरम्यान ताळमेळ राखण्यासाठी एक सेंट्रल कमांड स्थापन करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
ड्वोर्निकोव्ह यांना युक्रेनमध्ये रशियायच सैन्य मोहिमेचे थिएटर कमांडर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. रशियाच्या जनरलला 9 मे रोजी ‘विजय दिना’पूर्वी युद्धक्षेत्रावर कब्जा करण्याचे पुतीन यांनी निर्देश दिले असल्याची चर्चा आहे. 9 मे हा रशियासाठी सर्वात महत्त्वाचा दिवस आहे, याच दिवशी दुसऱया महायुद्धात जर्मनीवर सोव्हियत महासंघाने मिळविलेल्या विजयाचा दिन साजरा केला जातो. परंतु स्वतःकडून निर्धारित कालमर्यादेचे पालन करताना रशियाकडून अतिरिक्त चुका होण्याची शक्यता असल्याचे सुरक्षा तज्ञांचे म्हणणे आहे.
ड्वोर्निकोव्ह अनेक आघाडय़ांऐवजी आता केवळ डोनबास क्षेत्रावर लक्ष केंद्रीत करणार असल्याचे मानले जात आहे. 60 वर्षी ड्वोर्निकोव्ह हे सीरियामध्ये रशियाच्या सैन्य मोहिमेचे पहिले कमांडर होते. सीरियाचे अध्यक्ष बशर अल असाद सरकारचे समर्थन करण्यासाठी पुतीन यांनी सप्टेंबर 2015 मध्ये तेथे सैन्य पाठविले हेते. सप्टेंबर 2015 ते जून 2016 पर्यंत सीरियामध्ये ड्वोर्निकोव्ह यांच्या नेतृत्वात रशियाच्या लढाऊ विमानांनी असादविरोधी गटांना लक्ष्य केले होते.
रशियाचे सैन्य बॅकफूटवर
उत्तर युक्रेनमधून रशियाच्या सैनिकांनी माघार घेतली आहे. याचदरम्यान युक्रेनच्या वायुदलाने शनिवारी रशियाच्या 13 वायुतळांना नष्ट केले आहे. युक्रेनच्या वायुदलानुसार रशियाने 9 एप्रिल रोजी 5 युएव्ही, चार क्षेपणास्त्रs, तीन विमाने आणि एक हेलिकॉप्टर या युद्धात गमाविले आहे.
बूचामध्ये परतू लागले लोक
रशियाच्या नरसंहारामुळे चर्चेत आलेल्या बूचा शहरात लोक आता परतू लागले आहेत. प्रशासन आणि पोलीस पथक बचावाचे काम सातत्याने करत असून लोकांना सुरक्षेचा विश्वास देत आहे. बूचामध्ये 4 एप्रिल रोजी रशियाच्या सैनिकांनी सर्वसामान्य नागरिकांवर हल्ला चढविला होता. बूचा महापौरांनुसार या हल्ल्यात 360 जणांना जीव गमवावा लागला होता.
युक्रेनच्या वायुतळावर हल्ला
रशियाच्या सैन्याने मध्य युक्रेनच्या मिरहोरोड वायुतळावरील एका शस्त्रास्त्र भांडाराला नष्ट केले आहे. पोल्टावा क्षेत्रात तळावर झालेल्या हल्ल्यात युक्रेनच्या वायुदलाचे एक मिग-29 लढाऊ विमान आणि एक एमआय-8 हेलिकॉप्टरही नष्ट झाले आहे.