मुरगाव पलिका निवडणुकीतील प्रकार : मुलाच्या उमेदवारीला आड आले आरक्षण
प्रतिनिधी / वास्को
तिच्या पुत्राने गुढघ्याला बाशिंग बांधलेच होते. परंतु कुणाची तरी नजर बाधली आणि आरक्षण आड आले. त्यामुळे त्या पुत्राला 78 वर्षीय मायचा आधार घेण्यावाचून पर्याय राहिला नाही. पुत्राला नगरसेवक बनवण्याची जबाबदारी आता या मायवर येऊन पडलेली आहे.
कॅटरिना जुआव रूझारीयो झेवियर या वास्कोतील मेर्सिस वाडय़ावरील मायला वयाच्या 78 व्या वर्षी राजकारणात प्रवेश करणे भाग पडले आहे. मुरगावच्या पालिका निवडणुकीत ती उतरली आहे. गोव्यातील यंदाच्या पालिका निवडणुकीतील ही माय बहुदा सर्वात ज्येष्ठ उमेदवार असेल.
गावाशी बांधलेली तिची नाळ तुटली नाही
ही आधुनिक कॅटरिना नाही. ती गोव्यातील एक पारंपरिक, नीज गोंयकार माय आहे. येणाऱया जाणाऱयांची, बालकांपासून थोरामोठय़ांची अदबीने ख्यालीखुशाली विचारणारी वाडय़ावरील सर्वांची ती एक शेजारीण आहे. तिचा जन्म पोर्तुगीज काळातील. जिथून ती निवडणूक लढवत आहे, ते मेर्सिस वाडे वास्को हेच तिचे जन्मस्थान. वयाच्या सोळा सतराव्या वर्षीच ती झेवियर कुटुंबाची सून बनली. नवऱयानेही या वाडय़ावरच घर बांधले. त्यामुळे जन्मापासून या गावाशी बांधलेली तिची नाळ तुटू शकली नाही.
पारंपरिक, निसर्गसंपन्न गोव्याच्या साक्षीदार
त्या काळची दाट वनराई, माड, शेती, पायवाट आणि सायंकाळनंतरचा काळाकुट्ट अंधार, ना वीज ना पाणी, विहिरी आणि खळाळते झरे, पक्षांची किलबील आणि सरपटणारे प्राणी अशा जीवंत निसर्गाची प्रत्यक्ष साक्षीदार म्हणजेच कॅटरिना झेवियर. त्यावेळी घरासमोरील डोंगरावरून वाघ कसे उतरत होते याचेही वर्णन ती सहज करते. मेर्सिस वाडेच्या निसर्गाच्या कुशीत ती लहानाची मोठी झाली.
अजूनही सर्वांच्या हक्कासाठी लढू शकते
तिच्या नजरेसमोरूनच गावाचे निसर्गसौंदर्य विरळ होते गेले आणि काँक्रीटचे जंगल उभे राहिले. विकास कसा होत गेला, होत्याचे नव्हते कसे झाले, सुखसुविधा लोकांच्या दारापर्यंत कशा आल्या याचा सारीपाट त्या मांडू शकतात. कडूगोड आठवणी त्या कथन करू शकतात. पदराला कुठलेच शिक्षण नाही. आयुष्याचा अनुभव मात्र फार मोठा आहे. या वयातही त्या तावातावाने बोलू शकतात, हक्कांसाठी भांडू शकतात. असा ज्येष्ठ उमेदवार आजच्या पालिका निवडणुकांमध्ये सापडणे दुर्मिळच.
थकलेली मांय… पण थांबलेली नाय !
खरे तर तिचे आयुष्य शेती भातीत आणि माडांच्या सानिध्यात गेले. दाबोळी विमानतळाच्या उभारणीसह अनेक कष्टाची कामे तिने तरूणपणात केली. नवऱयाच्या साथीने आयुष्यभर काबाड कष्ट केले. आता ती थकलेली आहे. तरीही थांबलेली नाही. स्वतःच्या पायावर उभी आहे. कुणावर बोजा बनून राहिलेली नाही. आपली कामे ती स्वतःच करते. पाच मुलांची ही माय सुना नातवंडाचे चांगले दिवस पाहत दिवस काढतेय.
स्वतः निवडणूक लढणार असे स्वप्नातही नव्हते
आपला मुलगा लोकांची बारिकसारिक कामे करतोय, अडिअडचणीला धावतोय, मंत्री, आमदारांबरोबर वावरतोय याची तिला कल्पना होती. यंदा तो पालिका निवडणूक लढवणार याचीही तिला कल्पना होती. मात्र, आपल्यावरच निवडणुक लढवण्याची वेळ येईल असे तिला स्वप्नातही वाटले नव्हते. तशा तिने गोवा मुक्तीनंतरच्या प्रत्येक निवडणुका जवळून पाहिल्या आहेत. प्रत्येक निवडणुकीत मतदान न चुकता केले. दोन पाना आणि गुलाब यांचा इतिहास तिला माहीत आहे. महाराष्ट्रवादी सिंहाची ढरकाळीही तिला आजही आठवते. आजवर एवढाच तिचा राजकारणाशी संबंध होता. मात्र, आठ दिवसांपूर्वी तिच्या नशिबाने वेगळेच वळण घेतले.
पुत्राला नगरसेवक बनवण्यासाठी तिला निवडणुकीच्या रिंगणात उतरणे भाग पडले आहे. या वयात आणि माझ्यावर एवढे ओझे कशाला लादता असे म्हणत तिने सुरवातीला निवडणूक टाळण्याचा प्रयत्न केला. आपला प्रभाग एसटी महिलांसाठी राखीव आहे. तुझ्या शिवाय पर्याय नाही. तु फक्त हो म्हण, बाकीचे मी पाहून घेईन असे म्हणत मुलानेच मायला धीर दिला आणि निवडणूक लढवायला राजी केले. कार्यकर्त्यांचाही मूड तिने पाहिला आणि वयाच्या 78 व्या वर्षी राजकारणात प्रवेशकर्ती झाली. तिच्यापेक्षा निम्म्या वयाच्या आणि मुरगावच्या माजी नगराध्यक्षा सुमिता उसगावकर व अनिषा नोरोन्हा या महिलांशी त्यांची लढत होणार आहे. माय मात्र, निश्चिंत आहे. निवडून मी येणार आणि नगराची सेवा मात्र माझा मुलगा करणार, अशी खात्री ती व्यक्त करते. घोडा मैदान जवळच आहे. पाहुया माय लेकाचे भाग्य उजळते का?