सत्र न्यायालयाकडून काणकोण पोलिसाना कोर्टाची नोटीस
प्रतिनिधी / मडगाव
काणकोण तालुक्यातील चापोली धरणावर अश्लिल व्हिडिओचे चित्रिकरण केल्याप्रकरणी अभिनेत्री पुनम पांडे व तिचा पती सॅम अहमद बॉम्बे यांचा जामीन रद्द का करण्यात येऊ नये यासंबंधी मडगावच्या सत्र नायालयाने काणकोण पोलिसांना नोटीस जारी केली असून आज गुरुवारी यावर न्यायालयात सुनावणी होणार आहे.
31 ऑक्टोबर 2020 रोजी काणकोण येथील चापोली धरणावर पुनम पांडे हिने नग्न व अर्ध नग्न अवस्थेत पोझ दिली होती व त्या अवस्थेतील चित्रित केलेला व्हिडिओ गोवा तसेच गोव्याबाहेर समाज माध्यमांवरून प्रसारित झाला होता.
अशा पद्धतीने गोव्याबद्दल अत्यंत चुकीची माहिती जगभर गेल्याने गोव्याला काळा डाग लागला असल्याचे ‘बायलांचो एकवोट’च्या संस्थापक अध्यक्ष श्रीमती आवदा व्हियेगस यांनी म्हटले होते आणि यासंबंधी दक्षिण गोवा पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार केली होती.
काणकोण पोलिसांनी पुनम पांडे व तिचा पती सॅम अहमद बॉम्बे याना अटक केली होती. मात्र, अटक केल्यानंतर संशयित आरोपीनी न्यायालयाकडे जामिनासाठी अर्ज केला होता आणि या अर्जावर काणकोण न्यायालयाने काही अटी घालून जामिनावर सोडून देण्याचा आदेश पोलिसाना दिला होता.
अटींची पूर्तता केल्यानंतर काणकोण पोलिसांनी या दोन्ही संशयिताना जामिनावर सोडले होते. पुढील 6 दिवस काणकोण पोलीस स्थानकावर चौकशीसाठी हजेरी लावण्यात यावी अशीही त्यात एक अट होती. मात्र संशयितानी ही अट पाळली नाही. परिणामी, काणकोण परिसरातील सम्राट शरद भगत यांनी मडगावच्या सत्र न्यायालयात याचिका दाखल केली आणि या दोन्ही संशयिताना दिलेला जामीन रद्द करण्याची विनंती सत्र न्यायालयाकडे केली.
या याचिकेवर आधारुन न्यायालयाने काणकोण पोलिसांना नोटीस जारी केली आणि वरील दोन्ही संशयित आरोपींना दिलेला जामीन रद्द का करण्यात येऊ नये याची कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
आज गुरुवारी यावर सत्र न्यायालयात सुनावणी होणार असून अनेकांचे लक्ष आता या प्रकरणावर लागून राहिलेले आहे.