भाजप केंद्रीय निरीक्षकांकडून नावाची घोषणा : राज्यपालांकडे 25 आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र.बुधवारी डॉ. श्यामाप्रसाद स्टेडियमवर शपथविधी.पंतप्रधान, गृहमंत्री उपस्थित राहण्याची शक्यता
प्रतिनिधी /पणजी
नाटय़पूर्ण घडामोडीत आणि सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या मुख्यमंत्रीपदी कोण? याचे उत्तर या पदासाठी दावेदार असलेल्या विश्वजित राणे यांनीच दिले. मुख्यमंत्रीपदासाठी डॉ. प्रमोद सावंत यांच्या नावाचा प्रस्ताव मांडण्यास राणेंनाच भाजपचे निरीक्षक नरेंद्रसिंग तोमर आणि एल. मुरुगन यांनी भाग पाडले. डॉ. सावंत यांच्या नावाच्या प्रस्तावास रवी नाईक, रोहन खंवटे आदी नेत्यांनी हात उंचावून अनुमोदन दिले. सर्वानुमते डॉ. सावंत यांची मुख्यमंत्रीपदासाठी निवड झाल्याचे तोमर यांनी नंतर जाहीर केले. त्यानंतर मगो, तिन्ही अपक्ष यांच्यासह डॉ. प्रमोद सावंत यांनी राजभवनवर जाऊन 25 आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांची भेट घेऊन सादर केले. नव्या सरकारचा शपथविधी उद्या बुधवारी सायं. 4 वा. च्या दरम्यान डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीची शक्यता आहे.
गेले 11 दिवस राज्यातील ज्या क्षणाची वाट जनता पाहत होती त्या घटनेला मुहुर्त सापडला व डॉ. प्रमोद सावंत यांची भाजप आघाडी सरकारच्या नेतेपदी एकमतांने निवड झाली. काल सोमवारी भाजप प्रदेश मुख्यालयात पणजी येथे झालेल्या विधीमंडळ गटाच्या बैठकीत भाजपचे 20 ही आमदार उपस्थित होते. सायं. 4 वा. सुरु होणारी बैठक फार उशिरा सुरु झाली. तत्पूर्वी दुपारी गोव्यात पोहोचलेले भाजपचे निरीक्षक नरेंद्रसिंग तोमर आणि एल. मुरुगन हे हॉटेल सिदाद-द-गोवा येथे गेले.
निरीक्षकांनी सर्वांशी केली चर्चा
केंद्रीय निरीक्षकांनी दुपारी डॉ. प्रमोद सावंत यांच्याबरोबर चर्चा केली. विश्वजित राणे यांच्याबरोबर स्वतंत्रपणे चर्चा केली. त्यानंतर अपक्ष आमदार डॉ. चंद्रकांत शेटये आणि आलेक्स रेजिनाल्ड यांनाही चर्चेला बोलाविले तसेच मगो नेते सुदिन ढवळीकर आणि आमदार जीत आरोलकर तसेच पक्षाध्यक्ष दीपक ढवळीकर यांनाही चर्चेस बोलाविले. ढवळीकर थोडे उशिराच पोहोचले. तत्पूर्वी तोमर, एल. मुरुगन प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद शेट तानावडे, निवडणूक निरीक्षक देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक हे सर्वजण भाजप कार्यालयात पोहोचले.
विश्वजित राणे यांनाच भाग पाडले प्रस्ताव मांडण्यास
प्रदेश भाजप कार्यालयात निरीक्षकांनी सर्व आमदारांबरोबर स्वतंत्रपणे चर्चा केली व त्यांचे म्हणणे जाणून घेतले. त्यानंतर 5.30 नंतर सर्वांची एकत्रित बैठक घेतली व त्यात नेता निवडीची प्रक्रिया केली. त्यावेळी ज्या नेत्याने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासमोर आव्हान निर्माण केले त्याच विश्वजित राणे यांनाच सावंत यांच्या नावाचा प्रस्ताव मांडण्यास पक्षश्रेष्ठींनी भाग पाडले. त्यांनी तसा प्रस्ताव मांडला व उपस्थित सर्वांनीच हात उंचावून डॉ. प्रमोद सावंत यांच्या नावास मान्यता दिली.
सायं. 6.30 वा. तोमर यांनी प्रदेश भाजप कार्यालयाच्या खाली जाहीर पत्रकार परिषद घेऊन तिथे डॉ. सावंत यांच्या नावाची घोषणा केली. यावेळी जोरदार घोषणा देऊन डॉ. प्रमोद सावंत यांचे जोरदार स्वागत केले. प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद तानावडे यांनी डॉ. सावंत यांचे पुष्पहार गळ्य़ात घालून स्वागत केले व आलिंगनही दिले.
गोमंतकीय जनतेसमोर ‘नतमस्तक’ : मुख्यमंत्री
नेता निवडीच्या घोषणेनंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा तसेच भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे आणि देवेंद्र फडणवीस यांचे तसेच सर्व आमदारांचे, पक्ष कार्यकर्त्यांचेही त्यांनी आभार मानले. आपल्यावर जी जबाबदारी दिली त्याबद्दल आपण कृतज्ञ आहे आणि याचे सारे श्रेय हे गोमंतकीय जनतेला देतो आणि त्यांच्यासमोर आपण नतमस्तक होतो, असे डॉ. सावंत म्हणाले. गोमंतकीय जनतेने भाजपवर विश्वास ठेवला म्हणूनच आज आपण दुसऱयांदा या पदी पोहोचलो. गोव्याला स्वयंपूर्णतेकडे नेण्याचे स्वप्न आपण साकार करीन, असे डॉ. सावंत म्हणाले.
राज्यपालांना पाठिंब्याची पत्रे सादर
सायंकाळी 7.30 वा. राजभवनवर जाऊन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सत्ता संपादनाचा दावा पेश केला. भाजपतर्फे डॉ. प्रमोद सावंत आणि सदानंद शेट तानावडे यांनी 20 आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांना सादर केले. त्यानंतर मगो नेते सुदिन ढवळीकर यांनी आपण व जीत आरोलकर यांच्या स्वाक्षरीचे पत्र राज्यपालांना सादर केले. डॉ. चंद्रकांत शेटये, आलेक्स रेजिनाल्ड आणि अँथोनी वास या तिघाही अपक्षांनी राज्यपालांना स्वतःच्या स्वाक्षरीने डॉ. प्रमोद सावंत सरकारला पाठिंबा देणारी पत्रे सादर केली.
भाजपकडे 25 आमदारांचे बळ
गेल्या 10 मार्च रोजी गोवा विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर 10 ते 12 दिवस झाले तरी भाजपचा मुख्यमंत्री ठरत नव्हता तसेच सरकार स्थापनाही होत नसल्याने आणि भाजपतर्फे सरकार स्थापनेचा दावाही करण्यात न आल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य प्रकट होत होते. भाजपला 40 सदस्यसंख्येच्या विधानसभेत एकूण 25 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा करण्यात आला होता आणि एवढे संख्याबळ असतानाही मुख्यमंत्री कोण हे ठरत नसल्याने भाजपमध्ये या प्रकरणी धुसफुस असल्याचे समोर आले होते.
शेवटी प्रमोद सावंतच मुख्यमंत्री
आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी मुख्यमंत्री पदासाठी दावेदारी केल्यामुळे तिढा निर्माण झाला होता. तो सध्या तरी तात्पुरता सोडवण्यात भाजपला यश आले आहे. केंद्रीय निरीक्षक नरेंद्रसिंग तोमर आणि एल. मुरुगन हे भाजपचे दोन निरीक्षक गोव्यात आले आणि त्यांनी भाजप आमदारांसह पाठिंबा दिलेल्या तीन अपक्ष आमदारांची तसेच मगोप आमदारांची भेट घेऊन सर्वांची मते जाणून घेतली. बहुतेक सर्वांनी डॉ. सावंत यांच्या नावास पसंती दिली. शेवटी निरीक्षकांनी मुख्यमंत्रीपदासाठी डॉ. सावंत यांच्या नावाची घोषणा केली.
दोन टप्प्यात मंत्रिमंडळ शपथविधी
दोन टप्प्यात मंत्रिमंडळाची स्थापना करण्यात येणार असून प्रथम टप्प्यात डॉ. प्रमोद सावंत, विश्वजित राणे, सुदिन ढवळीकर, डॉ. चंद्रकांत शेटये व आलेक्स रेजिनाल्ड यांचा शिपथविधी होणार असल्याची माहिती मिळाली आहे. उत्तर गोवा जिह्यातील 4 तर दक्षिण गोवा जिह्यातील 4 आणि भाजप सोडून इतर पक्ष – अपक्षांना 3 अशी एकूण 11 मंत्रिपदे देण्यात येणार असल्याचे भाजपच्या सूत्रांनी सांगितले. त्याशिवाय सभापती, उपसभापती अशी दोन पदे भाजपमधील आमदारांना मिळणार असल्याचे सांगण्यात आले.
संभाव्य मंत्रिमंडळ…
नवनिर्वाचित मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे संभाव्य मंत्रिमंडळ नेमके कसे असेल याबाबतची उत्सुकता वाढली आहे आणि कुतुहलता निर्माण झाली आहे. संभाव्य मंत्रिमंडळ दोन टप्प्यात करण्यात येण्याची शक्यता आहे. भाजपबरोबरच मगोचे दोन आणि तीन अपक्ष यांचा पाठिंबा असल्यामुळे तीन मंत्रिपदे भाजपकडून बाहेर जातील तर भाजपच्या वाटय़ाला 9 मंत्रिपदे येतील. शिवाय सभापती व उपसभापती ही दोन्ही पदे भाजपच्या वाटय़ाला येतील.
प्राप्त माहितीनुसार, प्रमोद सावंत यांच्या मंत्रिमंडळाची रचना अशा पद्धतीने असू शकते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तर द्वितीय स्थानी विश्वजित राणे, तृतीय स्थानी सुदिन ढवळीकर तसेच सुभाष शिरोडकर किंवा रवी नाईक, डॉ. चंद्रकांत शेटये, आलेक्स रेजिनाल्ड, माविन गुदिन्हो, सुभाष फळदेसाई, गणेश गावकर, नीळकंठ हळर्णकर, रोहन खंवटे आणि बाबुश मोन्सेरात अशी रचना असू शकते. प्राप्त माहितीनुसार, रमेश तवडकर यांच्याकडे सभापती पदाचा कारभार सोपविला जाण्याची शक्यता आहे. उल्हास तुयेकर यांच्यावर देखील महत्त्वाची जबाबदारी सोपविली जाणार आहे.