वकिलांनी केली एकाची धुलाई, उडाला गोंधळ
प्रतिनिधी /बेळगाव
न्यायालयात पुन्हा एका वकिलाबरोबर हुज्जत घालून त्यांचा कोट धरण्याचा प्रकार घडला. यामुळे संतप्त झालेल्या वकिलांनी एकाची चांगलीच धुलाई केली. अशा घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे वकीलवर्गातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. 8 दिवसांपूर्वीच अशी घटना घडली होती. यामुळे वकीलही असुरक्षित असल्याची भावना व्यक्त होत आहे.
बार असोसिएशनची निवडणूक पार पाडल्यानंतर तसेच दोन दिवसांच्या सुटीनंतर मंगळवारी न्यायालये सुरू झाली. त्यामुळे न्यायालयात गर्दी होती. यावेळी लिफ्टमधून ये-जा करण्यासाठी साऱयांचीच धावपळ उडाली होती. त्याचवेळी एका व्यक्तीने वकिलांना धक्का दिला. त्यावेळी तुला दिसते की नाही? असा प्रश्न केला. त्यामुळे वादावादी झाली. अचानक त्या व्यक्तीने वकिलाचा कोटच धरला. त्यामुळे संतप्त झालेल्या वकिलांनी त्या व्यक्तीची चांगलीच धुलाई केली.
गर्दीच्या वेळीच ही घटना घडली. त्यामुळे मोठा गोंधळ उडाला. त्या व्यक्तीबरोबर आणखी तीन ते चार जण होते. मात्र त्यांनी तेथून काढतापाय घेतला. मात्र एका व्यक्तीला चांगलाच चोप दिला. वकिलांवर वारंवार असे हल्ले होत आहेत. याचबरोबर अनेकजण अरेरावी करीत आहेत.
अशा घटना वरचेवर घडत आहेत. त्यामुळे वकीलही संतप्त झाले आहेत. गोंधळ उडाला तेव्हा त्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र वकील ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.
प्रलंबित खटले तातडीने
निकालात काढण्याची गरज गेल्या काही महिन्यांमध्ये वारंवार अशा घटना घडत असल्यामुळे वकिलांमध्येही तीव्र नाराजी व्यक्त होत होती. त्या नाराजीचा सूरच उमटल्याचे मंगळवारच्या घटनेवरून दिसून आले. वकिलांनी मारहाण केल्यानंतर त्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेऊन मार्केट पोलीस स्थानकाकडे नेले. कोरोनामुळे न्यायालयामधून लवकर न्याय मिळत नाही. त्यामुळे पक्षकारही तणावाखाली आहेत. बऱयाचवेळा वकिलांबरोबरच त्यांचे वाद होताना दिसत आहेत. तेव्हा प्रलंबित खटले तातडीने निकालात काढावेत, अशी मागणी होत आहे.