कोरोना संकटादरम्यान चांगली बातमी – ब्रिटनच्या आरोग्य विभागाचे विधान
वृत्तसंस्था / लंडन
कोरोनाच्या तिसऱया लाटेच्या भीतीदरम्यान ब्रिटनच्या आरोग्य विभागाने चांगली बातमी दिली आहे. पब्लिक हेल्थ इंग्लंडने (पीएचई) कोरोना विषाणूच्या पुनर्संसर्गावर आधारित लोकसंख्या देखरेख डाटा प्रसिद्ध केला आहे. एकदा कोरोना संक्रमित झाल्यावर पुन्हा या विषाणूच्या तावडीत सापडण्याची जोखीम कमी असल्याचे नव्या डाटातून समोर आल्याचा दावा करण्यात आला आहे. हा डाटा पुन्हा कोरोनाच्या तावडीत सापडलेल्या लोकांची देखरेख ठेवणे आणि संक्रमणाचे वर्तन समजून घेण्यासाठी सार्वजनिक करण्यात आला आहे.
कोरोना विषाणूचे दुसऱयांदा संक्रमण होणाऱया लोकांची संख्या खूपच कमी आहे. इंग्लंडमध्ये महामारीच्या प्रारंभापासून 30 मे 2021 पर्यंत कोरोनाचे पुन्हा संक्रमण झालेले 15,893 रुग्ण सापडले होते. यादरम्यान पूर्ण इंग्लंडमध्ये 40 लाख कोरोनाबाधित आढळून आले हेते. पुन्हा संक्रमित झालेल्या लोकांचा आकडा एकूण संक्रमणाच्या 0.397 टक्केच आहे.
पुन्हा संक्रमणाची लोकांमध्ये भीती
कोरोनामुळे एकाहून अधिक वेळा संक्रमित होऊ शकतो का यावरून लोक मोठय़ा प्रमाणावर चिंतेत आहेत. लोक एकाहून अधिक वेळा संक्रमित होऊ शकतात हे आम्ही जाणतो. पण डाटाचे विश्लेषण केल्यास पुन्हा कोरोनाबाधित होण्याचे प्रमाण खूपच कमी असल्याचे दिसून आले असल्याचे उद्गार पब्लिक हेल्थ इंग्लंडमधील कोविड-19 विषयक स्ट्रटेजिक डायरेक्टर डॉ. सुसान हॉपकिन्स यांनी काढले आहेत.
कुठल्याही संक्रमणाची शक्यता कमी करण्यासाठी लसींचे दोन्ही डोस आणि दिशानिर्देशांचे सदैव पालन करणे महत्त्वाचे आहे. हा डाटा जून 2020 ते मे 2021 च्या अखेरपर्यंत पुनर्संसर्गाची शक्यता दर्शवितो. तरीही आम्ही दुसऱयांदा कोरोनाबाधित झालेल्या लोकांवरील लसीचा प्रभाव आणि आजाराचे गांभीर्य पाहणे सुरूच ठेवणार आहोत. दुसऱयांदा संक्रमित होणऱया बहुतांश रुग्णांमध्ये लक्षणे दिसून येत नसल्याचे हॉपकिन्स म्हणाले.
डेल्टा व्हेरियंट…
पुन्हा कोरोनाबाधित होण्याचा धोका वाढविण्यास कारणीभूत घटकाचा आम्ही शोध घेत आहोत. कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटमुळे अन्य कुठल्याही व्हेरियंटच्या तुलनेत पुन्हा कोरोनाबाधित होण्याचा धोका अधिक असल्याचा कुठलाच पुरावा सध्या उपलब्ध नाही. तरीही आम्ही पूर्ण स्थितीवर नजर ठेवून आहोत असे हॉपकिन्स यांनी सांगितले आहे.