प्रतिनिधी / सातारा
कोरोना कसा, कोठून जवळ येईल, त्याच्यापासून कोणाची सुटका नाही. असे सध्या चित्र सातारा जिल्ह्यातील आहे. शासकीय कार्यालयाना ही पुन्हा कोरोनाचा विळखा पडला आहे. जिल्हा परिषदेच्या बांधकाम उत्तरमध्ये मुख्य अभियंता यांना कोरोनाची बाधा झाली आहे. सार्वजनिक बांधकाममध्ये तीन अभियंत्यांना बाधा झाली असून ते तिघेही रुग्णालयात उपचार घेत आहेत. पंचायत समितीत बांधकाम विभागात एक अभियंता कोरोनामुक्त झाला आहे तर एक अभियंता घरीच होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत. सातारा पालिकेच्या पाणी पुरवठा विभागात नव्याने रुजू झालेले अभियंता बाधित झाल्याने विभागाला काल पासून टाळा लागला आहे
सातारा शहरात अनेक शासकीय कार्यालये आहेत. या कार्यालयामध्ये कोणी ना कोणी बाधित आढळून आले होते. तरीही चार दिवस कार्यालय बंद ठेवून पुन्हा कामकाज सुरू केल्याचे प्रकार घडले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागातल्या अभियंत्यांना सातत्याने कामानिमित्त मुंबई, पुणे येथे बैठकांना जावे लागते.सातारा येथे ही मंत्री, आमदार नेते आले की सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी जाऊन माहिती द्यावी लागते. आढावा द्यावा लागतो. अशा सततच्या दगदगीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तीन अभियंत्यांना मंगळवारी कोरोना झाल्याचे उघड झाले. ते सातारा येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. मात्र, बांधकाम विभाग सध्या अधिकाऱ्यांविना सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या उत्तर बांधकाममध्ये नुकताच पदभार स्वीकारलेले कार्यकारी अभियंता यांना कोरोनाची बाधा झाली. त्यामुळे दोन दिवस बांधकाम विभाग बंद ठेवण्याचे आदेश असल्याने दि.27 व 28रोजी हा विभाग बंद होता. सोमवारी तो विभाग सुरू होईल.
सातारा पंचायत समितीच्या बांधकाम विभागात ही एका अभियंत्यास पंधरा दिवसांपूर्वी हलका ताप आला होता. त्यामुळे कार्यालयात दोन दिवस न जाता कोरोनाची तपासणी केली होती. ती पॉझिटिव्ह येताच कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन बरे झाले आहेत. आता घरीच होम कोरोन टाइन मध्ये आहेत.तर त्यांच्या बाजूला काम करणारे दुसरे अभियंता यांना ही त्यांच्या गावात तपासणी झाली. त्यावेळी तेही बाधित आढळून आले. त्यांची प्रकृती ठीक असून ते होम आयसोलेशन म्हणून घरीच उपचार घेत आहेत.
सातारा पालिकेत पाणी पुरवठा विभागात नुकतेच बदली होऊन आलेले अभियंता कराडहून अपडाऊन करत आहेत त्यांनाच दोन दिवसांपूर्वी बाधा झाल्याचे निदर्शनास येताच काल पाणी पुरवठा विभागाला टाळा लावला आहे. सोमवारी हा विभाग पूर्ववत करण्यात येणार असल्याचे समजते. या विभागात कोण कोण संपर्कात त्यांच्या आले याची नुसतीच चर्चा सुरू आहे. शासकीय कार्यालयात बाधित होण्याचे प्रमाण वाढत आहे.