प्रतिनिधी/ बेळगाव
उच्च न्यायालयाने स्थगितीचा आदेश दिला असताना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी व ठेकेदार यांनी मच्छे येथून हलगा-मच्छे बायपास रस्ता पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न शनिवारी केला. यामुळे शेतकरी संतप्त होऊन त्यांनी अधिकाऱयांना जाब विचारला. रस्ता करण्यासाठी न्यायालयाने परवानगी दिली असेल तर दाखवा आणि रस्ता करा, असे सुनावले. त्यामुळे रस्ता करण्यासाठी आलेल्या अधिकाऱयांनी साहित्यासह काढता पाय घेतला. त्यानंतर शेतकऱयांनी मात्र दिवसभर तेथे ठाण मांडून उपोषण केले.
हलगा-मच्छे बायपास हा अत्यंत सुपीक जमिनीतून होत आहे. याचबरोबर काढलेले नोटिफिकेशन आणि करण्यात येत असलेल्या रस्त्यामध्ये मोठी तफावत आहे. त्याबाबत न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. त्या कामाला मनाईसुद्धा दिली आहे. असे असताना अधिकारी अचानकपणे हा रस्ता करण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. शनिवारी मच्छे येथून रस्त्याचा प्रारंभ करण्यासाठी अधिकारी जेसीबीसह दाखल झाले होते.
सदर माहिती मच्छे परिसरातील शेतकऱयांना मिळाली. त्यानंतर शेतकऱयांनी इतर शेतकऱयांना याची माहिती देताच मोठय़ा संख्येने शेतकरी जमा झाले. कोणाच्या आदेशानुसार तुम्ही रस्ता करत आहात, असे विचारले असता न्यायालयानेच आम्हाला रस्ता करण्यासाठी परवानगी दिल्याचे अधिकाऱयांनी सांगितले. त्यावेळी त्यांनी न्यायालयाची स्वाक्षरी नसलेले पेपर दाखविले. त्यानंतर शेतकऱयांनी न्यायालयाने दिलेल्या आदेशाची प्रत दिली असून तुम्ही ती वाचा. त्यानंतर कामाला सुरुवात करा, असे सुनावले.
अधिकाऱयांनी न्यायालयाची प्रत वाचल्यानंतर ठीक आहे, न्यायालयाकडून आदेश घेऊनच रस्ता करण्यास येऊ, असे सांगून तेथून काढता पाय घेतला. यावेळी शेतकरी संतप्त झाले होते. त्यानंतर शेतकऱयांनी त्या ठिकाणी धरणे आंदोलन छेडले. न्यायालयाचा आदेश झुगारून कंत्राटदार बायपासचे काम करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून आले. यावेळी राजू मरवे, हणमंत बाळेकुंदी, भोमेश बिर्जे, मोनाप्पा बाळेकुंद्री, महेश चतुर, तानाजी हलगेकर, सुभाष चौगले, लक्ष्मण देमजी, गोपाळ सोमनाचे, अनिल अनगोळकर, संजय सुळगेकर, मनोज कानशिडे, गोटू कानशिडे यांच्यासह मच्छे, वडगाव, अनगोळ परिसरातील शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.