कठडय़ाचा कोसळलेला भाग ताबडतोब बसविण्याचा तसेच पुलावरून वाहतूक सुरू करण्याचा आदेश
वार्ताहर/ केपे
कुशावती नदीला आलेल्या पुरानंतर पारोडा येथे शनिवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पाहणी केली व पुरात पारोडा येथील पुलाच्या कठडय़ाचा जो भाग कोसळला आहे तो ताबडतोब नव्याने उभारण्याचा आदेश दिला. या पुलावरून वाहतूक सुरू करण्यात यावी असा आदेशही मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱयांना दिला. तसेच श्री चंदेश्वर भूतनाथ देवस्थान, पर्वत-पारोडा येथे जाण्याचा रस्ता खचला असून त्याचीही मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली व ताबडतोब उपाययोजना आखण्याच्या आदेश दिला.
गेल्या काही दिवसांत मुसळधार पाऊस कोसळल्यानंतर शनिवारी पावसाने विश्रांती घेतल्याने कुशावती नदीच्या पुराचे पाणी ओसरले असले, तरी पारोडा पुलाच्या कठडय़ाचा एक भाग कोसळला असून लोकांच्या सुरक्षिततेचा विचार करून प्रशासनाने सकाळपासून अडथळे उभारून दोन्ही बाजूंनी वाहतूक अडविली. त्यामुळे सकाळी काही नागरिकांनी या पुलावरून ये-जा करायला मिळत नसल्याने नाराजीही व्यक्त केली. मात्र लोकहिताचा विचार करूनच पूल वाहतुकीकरिता बंद करण्यात आला होता, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
दुसऱया बाजूने केपे ते मडगाव मुख्य रस्त्यावरचे पाणी ओसरले असले, तरी पाण्याबरोबर वाहून आलेली माता रस्त्यावर साठली होती. त्यामुळे अग्निशामक दलाकडून पाणी फवारून रस्ता स्वच्छ करण्यात आला. कुशावती नदीतील पाण्याची पातळी बरीच कमी झालेली असली, तरी पारोडा पुलाच्या कठडय़ाचा एक भाग पुराच्या पाण्याच्या प्रभावामुळे वाहून गेल्याने अवेडे-कोठंबी या भागांतून पारोडा येथे पुलावरून येणे धोकादायक बनले.
पारोडा व अवेडे-कोठंबी अशा दोन पंचायतींना जोडणारा हा पूल असून पारोडा पंचायतीचा कुंकळ्ळी, तर अवेडे-कोठंबीचा केपे मतदारसंघात समावेश होतो. त्यामुळे पुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमाव व केपेचे आमदार एल्टन डिकॉस्ता यांनीही पारोडा पुलाच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत पोलीस उपअधीक्षक नीलेश राणे, उपजिल्हाधिकारी शर्मिला गावकर, मामलेदार प्रताप गावकर व इतर हजर होते.
उंची वाढवून नवा पूल बांधावा ः डिकॉस्ता
याच पुलाजवळ उंची वाढवून नवा पूल बांधण्यात यावा असा प्रस्ताव आम्ही सरकारकडे देणार आहोत. त्यापूर्वी सध्याच्या पुलाच्या कठडय़ाचा जो भाग वाहून गेला आहे तो नव्याने बांधण्यात यावा, असे सागितले आहे. फार जुना पूल असल्याने त्याला काही झालेले नाही. आताचा असता, तर तो वाहून गेला असता, असे आमदार डिकॉस्ता यांनी यावेळी सांगितले. तर यंदा खूपच पाऊस झाला असल्याने त्याचा फटका बसला आहे. पण पारोडा पूल व जवळपासचा परिसर दरवर्षी का बुडतो यावर सरकारने तज्ञांची मदत घेऊन अभ्यास करण्याची गरज आहे, असे आमदार आलेमाव यांनी सागितले.
शनिवारी सकाळपासूनच मुख्यमंत्री पारोडा येथील पुलाला भेट देतील असा अंदाज व्यक्त होऊ लागला होता. कारण सकाळी मुख्यमंत्री सावंत हे धारबांदोडा परिसरात होते व तेथून ते काणकोण येथे जाणार होते. काणकोणहून परत येताना दुपारी 3 च्या दरम्यान मुख्यमंत्र्यांनी पारोडा येथे भेट दिली व पुलाची पाहणी केली. त्यांना पुलाच्या कठडय़ाचा एक भाग वाहून गेल्याचे दिसताच ताबडतोब तो बसविण्यात यावा असा आदेश दिला व स्थानिकांना ये-जा करण्याकरिता होणारी अडचण पाहून ताबडतोब वाहतूक सुरू करावी, असा आदेश दिला. त्यानंतर जवळच असलेला पर्वत-पारोडा येथील श्री चंद्रेश्वर भूतनाथ देवस्थानाकडे जाणारा रस्ता पाण्याच्या प्रभावाने खचल्याने त्या रस्त्याचे कामही ताबडतोब हाती घ्यावे, असे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत माजी आमदार क्लाफास डायस उपस्थित होते.