पंचायतीवर मोर्चा नेऊन सरपंच हनुमंत नाईकला धरले धारेवर : प्रकल्प रद्द करण्याची एकच मागणी
प्रतिनिधी /म्हापसा
आसगांव बार्देश येथील श्री देव दत्तात्रय औदुंबर देवस्थनला लागूनच पुरातन झरी असून या झरीचे पाणी देवाला आंघोळ घालण्यासाठी वापरतात. शिवाय या झरीच्या पाण्याचा वापर पिण्यासाठी केला जातो मात्र या झरीच्या बाजूलाच एका बिल्डरने भला मोठा प्रकल्प आणला आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पाला लागूनच असलेल्या या झरीचा आराखडय़ात उल्लेखही केलेला नाही. पंचायत मंडळानी या प्रकल्पास नाहरकत दाखला दिलेला आहे हे कारण पुढे करून देवस्थानचे पदाधिकारी व ग्रामस्थानी भव्य मोर्चा काढीत पंचायतमध्ये जाऊन सरपंच हनुमंत नाईक यांनी सळो की पळो करून सोडले.
आमची झर आम्हाला द्या ही एकच मागणी करीत सरपंचानी झरीचा प्रश्न योग्यरित्या न हाताळता त्या बेकायदेशीर प्रकल्पास परवानगी कशी काय दिली असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. देवस्थानचे अध्यक्ष चंदन मांद्रेकर, माजी अध्यक्ष दिलीप गावडे, रुपेश गावस, चंद्रकांत बंडू सावंत, पंच जालिंदर गांवकर, नितीन गावस यांनी पुढाकार घेऊन सरपंचाना जाब विचारत बरेच धारेवर धरले. आसगाव दत्तात्रय औदुंबर मंदिराकडून सुमारे अर्धातास पायवाटेने चालत नागरिक एकवटले व सरपंच हनुमंत नाईक यांच्या विरोधात घोषणा देत व हुर्यो उडवित आसगाव पंचायतीवर मोर्चा नेला.
हा प्रकल्प येण्यामागे सरपंच हनुमंत नाईक जबाबदार
सरपंचानी आराखडा न पाहता या बिगर गोमंतकीय नागरिकास येथे परवानगी कशी दिली. या प्रकल्पामुळे येथील झरीचे पाणी दूषित झाले आहे. येथे पाण्याला दुर्गंधी येत आहे. कामगारांसाठी शौचालयाची सोय नसल्याने ते उघडय़ावर प्रातविधीस बसतात. हा सर्व प्रकार चुकीचा आहे. पारंपरिक झरीला आराखडय़ात न दाखविता दिल्लीवाल्यांकडून पंचायत मंडळाने मोठय़ा प्रमाणात पैसे उकळले असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. सरपंच हनुमंत नाईक यांना यावेळी बरेच धारेवर धरले मात्र ते ग्रामस्थांपुढे योग्य उत्तरे देऊ शकले नाही. ते उत्तरे देण्यास आले असता नागरिकांनी त्यांना बोलण्यास दिले नाही व प्रतिउत्तर करून धारेवर धरले.
माजी उपसरपंच तथा पंच कार्तिक कुडणेकर यांनी पंचायतीच्यावतीने बाजू मांडण्याचा प्रयत्न केला असता नागरिकांनी त्यांनाही बरेच धारेवर धरले. त्या दोन दिवसात आपल्याकडे चार्ज होता पण आराखडा नगरनियोजन खात्याने मंजूर केला असे कार्तिकने सांगताच नागरिकांनी पैसे घेऊन आराखडय़ावर सही घेतली काय व तो पंचायत बैठकीत मंजूर करून घेतला काय? असा प्रतिसवाल करून त्यांच्यावर आरोप केले.
कागदपत्रे तपासूनच परवानगी : सरपंच हनुमंत नाईक
आसगाव येथे औदुंबर मंदिराजवळ बाबू नायर यांचे कन्स्ट्रक्शन परवान्यासाठी फाईल पंचायतीमध्ये आली होती. 16 जानेवारीच्या बैठकीत पास झाले. शौचालय व सोपपीट याला आरोग्य खात्याने नाहरकत दाखला दिला होता. त्यावेळी पंचायतीने आरोग्य खात्याला विचारले असता तो प्रकल्प 20 मीटर लांब आहे आणि कायद्याप्रमाणे आम्ही त्या प्रकल्पास परवाना दिला आहे. त्या जागेच्या मालकाने पंचायतीला पत्र लिहून प्रकल्पातील एक बंगला रद्द करून शौचालय लांब बांधण्यात येईल असे कळविल्याचे नागरिकांना सांगण्याचा प्रयत्न केला असला ते ऐकण्याच्या परिस्थितीत नव्हते असे सरपंच हनुमंत नाईक यांनी सांगितले
तो प्रकल्प रद्द करा अन्यथा न्यायालयात धाव घेणार- चंदन मांद्रेकर
हा प्रकल्प रद्द करा अन्यथा न्यायालयात जाऊ शिवाय यावर व्हिजीलन्स घालणार असल्याची माहिती देवस्थान अध्यक्ष चंदन मांद्रेकर यांनी दिली. ग्रामस्थ रुपेश गावस म्हणाले की, गेले पाच महिने हा लढा आम्ही लढत आहोत. यापूर्वी आम्ही त्यांना विचारले तेव्हा सरपंचांनी हा प्रकल्प कायदेशीर आहे त्यामुळे त्यांनी काहीच केले नाही. बायोडायव्हर्सिटी कायद्यांतर्गत हा प्रकल्प बेकायदेशीर असून तो रद्द व्हायलाच पाहिजे अशी प्रतिक्रिया रुपेश गावस यांनी व्यक्त केली.
बांधकाम बंद ठेवण्याचा पंचायतीचा निर्णय
दरम्यान, आसगांव पंचायतीनी बाबू नायर व मारीया इवोन डिकॉस्ता उर्फ सुनिता नायर यांना नोटीस बजावून आपण 11 व्हिला, स्विमींगपूल, कुंपण सर्वे क्रमांक 171/10 मध्ये जुन्या पारंपरिक झरीजवळ ही झर आराखडय़ात न दाखविता आराखडा तयार करण्यात आला आहे. ही झर दत्तात्रय देवाला आंघोळ घालण्यासाठी, धोंड येथे आंघोळ करतात, गणेश विसर्जन येथे होते. पिण्यासाठी या पाण्याचा वापर केला जातो. त्यामुळेच 24 ऑगस्ट झालेल्या खास बैठकीत सदर बांधकाम आपण त्वरित बंद पाडावे व या बांधकाम परवाना रद्द का करू नये अशी नोटीस पंचायतीने बजावली आहे.