ऑलिम्पिक हॉकी – 5-3 फरकाने यश, गुर्जंतचे दोन गोल
वृत्तसंस्था/ टोकियो
भारतीय पुरुष हॉकी संघाने शुक्रवारी झालेल्या अ गटातील शेवटच्या साखळी सामन्यात यजमान जपानचा 5-3 असा पराभव केला. गुर्जंत सिंगने भारतातर्फे दोन गोल नोंदवले.
भारताने साखळी फेरीत एक पराभव आणि चार विजय नोंदवले असून भारताचे उपांत्यपूर्व फेरीतील स्थान याआधीच निश्चित झाले आहे. गुर्जंत सिंग (17 व 56 वे मिनिट), हरमनप्रीत सिंग (13), शमशेर सिंग (34), निलकांता शर्मा (51) यांनी भारताचे गोल नोंदवले. गट अ मधील त्यांचा हा सलग तिसरा विजय आहे. जपानतर्फे केन्टा तनाका (19), कोटा वाटानबे (33), काझुमा मोराटा (59) यांनी गोल नोंदवले. जपानचे या स्पर्धेतील आव्हान याआधीच संपुष्टात आले आहे. या विजयानंतर भारताने गटात ऑस्ट्रेलियानंतर दुसरे स्थान मिळविले असून ऑस्ट्रेलियाने पहिले स्थान मिळविताना चार विजय मिळविले व एक सामना अनिर्णीत राखला. भारताचा एकमेव पराभव ऑस्ट्रेलियाकडूनच झाला होता. प्रत्येक गटातील सहा संघ उपांत्यपूर्व फेरीत खेळणार आहेत.
भारताने प्रारंभापासूनच आक्रमणास सुरुवात केली असली तरी पहिल्या दहा मिनिटांत जपानच्या बचावफळीने त्यांना गोलपासून दूर ठेवले होते. 13 व्या मिनिटाला पहिले यश मिळाल्यानंतर मात्र ठरावीक अंतराने गोल होत गेले. दुसऱया सत्रात गुर्जंतने, तिसऱया सत्रात शमशेर सिंगने आणि चौथ्या सत्रात निलकांता शर्मा व गुर्जंत सिंग यांनी गोल केले. जपानने दुसऱया, तिसऱया व चौथ्या सत्रात एकेक गोल नोंदवले. भारताला या सामन्यात चार तर जपानला एक पेनल्टी कॉर्नर मिळाला.