वृत्तसंस्था/ टोकियो
टोकियो ऑलिंपिक स्पर्धेतील पुरूष हॉकी या क्रीडाप्रकारात अ गटातील भारताचा तिसरा सामना स्पेनबरोबर मंगळवारी खेळविला जाणार आहे. भारतीय हॉकी संघाला ऑस्ट्रेलिया बरोबरच्या दारूण पराभवानंतर पुन्हा मुसंडी मारण्याची संधी लाभली आहे.
मनदीप सिंगच्या नेतृत्वाखाली भारतीय पुरूष हॉकी संघाच्या टोकियो ऑलिंपिक मोहिमेला समाधानकारक प्रारंभ झाला. अ गटातील झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडवर 3-2 अशा गोल फरकाने निसटता विजय मिळविला होता पण त्यानंतर या गटातील झालेल्या दुसऱया सामन्यात अग्रमानांकित आणि बलाढय़ ऑस्ट्रेलियाने भारताचा 7-1 अशा गोलफरकाने दणदणीत पराभव केला. या सामन्यात सर्वच विभागात ऑस्ट्रेलियाची कामगिरी दर्जेदार झाली. ऑस्ट्रेलियाला आक्रमक आणि वेगवान खेळापासून रोखण्यात भारत पूर्ण अपयशी ठरला. आता स्पेनवर मंगळवारच्या सामन्यात भारतीय संघ मोठय़ा गोलफरकाने विजय मिळविण्याचा प्रयत्न करेल. जागतिक हॉकी मानांकनात भारत सध्या चौथ्या स्थानावर आहे तर स्पेन नवव्या स्थानावर आहे. स्पर्धेच्या गुणतक्त्यात अ गटात भारत सध्या चौथ्या स्थानावर आहे. मात्र न्यूझीलंडने सरस गोल सरासरीच्या जोरावर भारताला मागे टाकले असून हा संघ सध्या तिसऱया स्थानावर आहे. अ गटात ऑस्ट्रेलिया दोन विजयासह पहिल्या स्थानावर असून विद्यमान ऑलिंपिक विजेता अर्जेंटिना चार गुणांसह दुसऱया स्थानावर आहे. स्पेन आणि यजमान जपान यांना त्यांच्या पहिल्या दोन सामन्यात विजय नोंदविता आलेला नाही.