वृत्तसंस्था/ श्रीनगर :
जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा दलांनी पुलवामासारख्या आत्मघाती हल्ल्याचा मोठा कट उधळला आहे. पुलवामाच्या अयान गुंड भागातून सैन्याने आयईडी स्फोटकांनी भरलेली सॅन्ट्रो कार जप्त केली. सदर कारमध्ये धोका असल्याची खात्री झाल्यानंतर सुरक्षा पथकाने सर्व स्फोटके अचूकपणे उद्ध्वस्त केली. कारमध्ये बसवलेल्या स्फोटकांचे वजन सुमारे 45 किलो होते. आयईडीने सुसज्ज अशी कार हिजबुल मुजाहिद्दीन आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या सदस्यांनी तयार केली होती, अशी माहिती सुरक्षा दलांकडून संयुक्तपणे देण्यात आली.
स्थानिक पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफ या सुरक्षा यंत्रणांना गेल्या अनेक दिवसांपासून संभाव्य आत्मघाती हल्ल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार गेल्या चार-पाच दिवसांपासून राज्यात कडक तपासणी सुरू होती. दहशतवादी हल्ल्यासाठी सज्ज असलेले वाहन पुलवामा मार्गावर येणार असल्याची ठोस माहिती पुन्हा एकदा बुधवारी सुरक्षा दलांना मिळाली. या माहितीच्या आधारे पुलवामा जिल्हय़ात विविध भागात विशेष तपासणी पथकांची नियुक्ती करण्यात आली. ज्या कारमध्ये आत्मघाती हल्लेखोर बसले होते त्या गाडीला दोन पॉईंटवर थांबवून इशारा म्हणून गोळीबार केला पण चालक सुसाट निघाला. पुढच्या नाक्यावर पोलीस आणि जवानांनी त्या गाडीवर गोळीबार केला. मात्र, अंधाराचा फायदा घेत चालकाने गाडी सोडून पलायन केले. पुलवामाच्या अयानगुंड येथील राजपोरा भागात बुधवारी रात्री उशिरा हा थरार घडला.
संशयित फरार, स्फोटके निष्क्रीय
दहशतवाद्यांचा शोध घेणाऱया सुरक्षा दलाला सदर कार संशयित परिस्थितीत अयानगुंज परिसरात सुनसान जागेत उभी राहिल्याची माहिती मिळाली. जवानांनी परिसर घेरला आणि आसपासच्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले. दरम्यान, बॉम्ब विल्हेवाट पथकाला पाचारण करण्यात आले. वाहनाची तपासणी केल्यावर पथकाला कारमध्ये किमान 40 ते 45 किलो स्फोटक सामग्रीने भरलेली आहे. यात अमोनियम नायट्रेट, आरडीएक्स आणि इतर साहित्य समाविष्ट होते. दुसऱया ठिकाणी गाडी हलविणे शक्य नव्हते, म्हणूनच तेथेच ती नष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला.
पथकाने कारचा स्फोट केला. स्फोटके निष्क्रीय करताना जमिनीपासून 50 मीटर उंचीपर्यंत धुळीचे व धुराचे लोट उडाल्याचे सांगण्यात आले.
कटात चालकासह दोघांचा सहभाग?
प्राथमिक तपासणीत सुरक्षा दलांनी यात सामील झालेल्या दोन दहशतवाद्यांची ओळख उघड केली आहे. यातील एकाचे नाव आदिल असे असून तो जैश आणि हिजबुल मुजाहिद्दीन या दोन्ही संघटनांसाठी काम करत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. आदिल हाच स्फोटकांनी भरलेली कार चालवत असल्याचे सांगण्यात येत आहे. पाकिस्तानी दहशतवादी फौजी भाईही त्याच्यासोबत कारमध्ये होता. तोसुद्धा जैशसाठी काम करत असल्याचे उघड झाले आहे, असे घटनेची माहिती देताना जम्मू-काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार म्हणाले.
स्फोटके तयार करणाऱयाचाही शोध
सुरक्षा दलांनी आयईडी तयार करणाऱया दहशतवाद्याचा शोधही घेतला आहे. पाकिस्तानी दहशतवादी वलीदने स्फोटके तयार केल्याचे सुरक्षा यंत्रणांचे म्हणणे आहे. सक्रीय दहशतवादी वलीद उर्फ मूसा उर्फ इडलिस हा 2015 पासून घाटीत सक्रिय असल्याची माहिती मिळाली असून त्याचा शोध घेण्याचे काम गुरुवारी दिवसभर सुरू होते.
स्फोट घडविण्यासाठी कारच्या रचनेत बदल
आयईडीने सुसज्ज असे वाहन हिजबुल मुजाहिद्दीन आणि जैश-ए-मोहम्मद यांनी दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्हय़ात सुरक्षा दलाला लक्ष्य करण्यासाठी डिझाईन केले होते. कारमध्ये स्फोटके ठेवण्यासाठी आणि स्फोट घडवण्यासाठी वाहनाच्या रचनेत बदल करण्यात आल्याचेही तपासात आढळून आले आहे.
14 फेब्रुवारी 2019 रोजी यापूर्वीचा पुलवामा ऍटॅक
गेल्या वर्षी 14 फेब्रुवारी रोजी सीआरपीएफच्या ताफ्यावर स्फोटकांनी भरलेल्या गाडीचा वापर करून दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात देशातील 40 जवान हुतात्मा झाले होते. जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी स्फोटकांनी भरलेल्या गाडीने सुरक्षा रक्षकांना घेऊन जाणाऱया बसवर धडक देत देश हादरवून टाकणारा हल्ला केला होता.