ऑनलाईन टीम / श्रीनगर :
पुलवामामध्ये पोलिसांनी जैश-ए-मोहम्मदच्या मॉडय़ूलचा पर्दाफाश करत दहशतवाद्यांच्या तीन मदतनीसांना शस्त्रास्त्रांसह अटक केली आहे. आयजी काश्मीर विजय कुमार यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
विजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेले तीन मदतनीस पुलवामा जिल्ह्यात सक्रिय असलेल्या दहशतवाद्यांची राहण्याची व्यवस्था करत असत. त्याचबरोबर त्यांच्या आगमनाची व्यवस्था करण्यासह इतर प्रकारच्या सुविधाही त्यांनी उपलब्ध करून दिल्या होत्या. त्यांच्याकडून एक एके-47 रायफल, तीन मॅगझिन आणि 69 बुलेट्स जप्त करण्यात आल्या आहेत. जंदवाल येथील ओवेस अल्ताफ, गुडुरा येथील आकिब मंजूर आणि करीमाबाद येथील वसीम अहमद पंडित अशी अटक करण्यात आलेल्या मदतनिसांची नावे आहेत. पुलवामा पोलीस त्यांची चौकशी करत आहेत. पुलवामा पोलीस, 55 राष्ट्रीय रायफल्स आणि 182-183 बटालियन सीआरपीएफने ही संयुक्त कारवाई केली.