ऑनलाईन टीम / श्रीनगर :
जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलांनी दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा केला. ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख यासिर पारे याचा समावेश आहे. तो आयईडी तयार करण्याचा मास्टरमाइंड असल्याचे सांगितले जाते. तर फुरकान असे दुसऱ्या दहशतवाद्याचे नाव आहे. तो बराच काळ या भागातील दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय होता. पुलवामामधील राजपोरा येथे मंगळवारी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली.
राजपोरा परिसरातील एका घरात दहशतवादी लपल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांमार्फत सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी रात्री उशिरा पोलीस-सीआरपीएफ आणि लष्कराने संयुक्त पथक तयार करून या भागाला घेराव घातला. सुरक्षा दलाने दहशतवाद्यांना शरण येण्यास सांगितले. मात्र, घरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. या गोळीबाराला सुरक्षा दलानेही चोख प्रत्युत्तर दिले. यात दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले.