ऑनलाईन टीम / श्रीनगर :
जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील कामराजीपोरा परिसरात दोन दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यास जवानांना यश आले. या कारवाईत एक भारतीय जवान शहीद झाला आहे. आज पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास ही चकमक झाली.
कामराजीपोरा क्षेत्रातील सफरचंद बागेत लपलेल्या दोन दहशतवाद्यांना सुरक्षा दलाच्या जवानांनी घेरले होते. त्यावेळी दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला. या गोळीबाराला सुरक्षा दलाच्या जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले. या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला. तर गोळीबारात एक जवान जखमी झाला होता. या जवानाला श्रीनगरच्या लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
सुरक्षा दलाच्या जवानांनी दहशतवाद्यांकडील एक एके-47 रायफल, हॅण्डग्रेनेडसह अन्य शस्त्रसाठा ताब्यात घेतला आहे. जवानांनी कामराजीपोरा परिसराला वेढा दिला असून शोधमोहीम सुरू आहे.