सैनिक तसेच विशेष पोलीस अधिकारी हुतात्मा : अवंतिपोरा येथे झाली चकमक
श्रीनगर
जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्हय़ाच्या अवंतिपोरामध्ये मंगळवारी दहशतवादी आणि सुरक्षा दलांच्या दरम्यान चकमक झाली आहे. या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. तर एक सैनिक आणि जम्मू-काश्मीर पोलिसांचा विशेष पोलीस अधिकारी हुतात्मा झाला आहे. दहशतवाद्यांच्या अस्तित्वाची माहिती मिळताच सुरक्षा दलांनी जंतरग आणि खेरू गावानजीक शोधमोहीम हाती घेतली होती. राष्ट्रीय रायफल्स, जम्मू-काश्मीर पोलिसांचे विशेष मोहीम पथक आणि सीआरपीएफचे जवान तेथे पोहोचताच दहशतवाद्यांनी गोळीबारास प्रारंभ केला. सुरक्षा दलांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत दोन दहशतवादी मारले गेले आहेत. गोळीबारात एक सैनिक आणि विशेष पोलीस अधिकारी हुतात्मा झाल्याची माहिती सैन्याने दिली आहे.
अवंतिपोरा येथील या चकमकीची माहिती मिळताच अतिरिक्त सुरक्षा दल घटनास्थळी पाठविण्यात आले आहे. काश्मीरमध्ये 24 तासांच्या दरम्यान ही दुसरी मोठी चकमक ठरली आहे. काश्मीरच्या शोपियां जिल्हय़ात सोमवारी झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिदीनचे तीन दहशतवादी मारले गेले होते.