काश्मीरमध्ये चकमक ः सुरक्षा दलाला मोठे यश
श्रीनगर / वृत्तसंस्था
पुलवामा येथे शनिवारी झालेल्या चकमकीत ‘जैश-ए-महंमद’ संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. खात्मा केलेल्या दहशतवाद्यांमध्ये कुख्यात दहशतवादी आणि जैश-एöमहंमदचा प्रमुख मसूद अझहर याच्या निकटवर्तीयाचा समावेश आहे. मोहम्मद इस्माल अल्वी उर्फ लंबू उर्फ अदनान असे संबंधिताचे नाव असून त्याच्या अन्य एका साथीदारालाही ठार मारण्यात आले आहे. या दोघांचाही पुलवामा येथे 2019 मध्ये झालेल्या हल्ल्यामध्ये थेट सहभाग असल्यामुळे सुरक्षा दलाच्या दृष्टीने ‘लंबू’चा खात्मा हे मोठे यश मानले जात आहे. काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी लंबूला कंठस्नान घातल्याबद्दल लष्कर आणि पोलिसांचे अभिनंदन केले आहे.
पुलवामा जिल्हय़ात बडय़ा दहशतवाद्यांनी आश्रय घेतल्याची माहिती गुप्तचर विभागाकडून प्राप्त झाल्यानंतर येथे विशेष शोधमोहीम राबविण्यात आली. नेगबारन-तरसर जंगलात पोलीस आणि लष्कराने राबविलेल्या शोध मोहिमेवेळी ही चकमक उडाली. मिळालेल्या विश्वसनीय माहितीवरून या पथकाने या परिसराची नाकाबंदी केली आणि शोधमोहीम सुरू केली. पोलिसांनी घेरल्याचे लक्षात येताच या दहशतवाद्यांनी ते लपलेल्या ठिकाणाहून बाहेर येत अंधाधुंद गोळीबार सुरू केला. त्यावेळी ही चकमक उडाली. या मोहिमेवेळी दोघांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश मिळाल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली. लंबू उर्फ अदनान याच्या साथीदाराचाही खात्मा करण्यात आला. मात्र त्याची ओळख पटू शकली नाही. जैश-ए-महंमदचा कुख्यात दहशतवादी लंबू याला शनिवारी सकाळी कंठस्नान घालण्यात आले, अशी माहिती पोलिसांनी दिली.
लंबू हा अझहरच्या कुटुंबातील सदस्य होता. पुलवामामध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलावर 2019 मध्ये झालेल्या हल्ल्याचा कट रचण्यात त्याचा सहभाग होता. या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे 40 जवान मारले गेले होते. या प्रकरणात एनआयएने दाखल केलेल्या आरोपपत्रात त्याच्या नावाचा उल्लेख होता.