नवी दिल्ली / वृत्तसंस्था
फेब्रुवारी 2019 मध्ये जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याप्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण प्राधिकरणाने (एनआयए) आरोपपत्र सादर केले आहे. यात पाकिस्तानस्थित जैश ए मोहम्मद या संघटनेचा म्होरक्या मसूद अझर याला प्रमुख आरोपी बनविण्यात आले. या कटाचा सूत्रधार तोच असल्याचे स्पष्ट होत आहे. त्याच्या भावाचाही आरोपी म्हणून समावेश आहे.
या हल्ल्यात सीमा सुरक्षा दलाचे 40 सैनिक धारातीर्थी पडले होते. त्यामुळे देशभर संतापाची लाट उसळली होती. या घटनेनंतर 12 दिवसांनी भारतीय लढाऊ विमानांनी पाकिस्तानात घुसून बालाकोट येथील दहशतवादी तळांवर हल्ले चढविले होते. त्यात किमान 150 दहशतवादी आणि त्यांचे प्रशिक्षक ठार झाल्याचे सांगण्यात आले होते. काही आंतरराष्ट्रीय संस्थांनीही याला दुजोरा दिला होता.
एकंदर 19 आरोपी
आरोपपत्रात एकंदर 19 आरोपींची नावे आहेत. आरोपपत्र तब्बल 13 हजार 500 पानांचे आहे. यापैकी सात आरोपींना अटक करण्यात आल्याने ते प्राधिकरणाच्या ताब्यात आहेत. 7 आरोपींचा नंतर विविध चकमकींमध्ये एन्काऊंटर करण्यात आला आहे. यात मसूद अझर याचा पुतण्या उमर फारूख याचाही समावेश आहे. पाच आरोपी पाकिस्तानात आहेत, असे सांगण्यात आले.
भक्कम पुरावा
सर्व आरोपींच्या विरोधात भक्कम पुरावा असल्याचे प्राधिकरणाने स्पष्ट केले. 2018 मध्ये मसूदचा आणखी एक पुतण्या उस्मान हैदर सैनिकांकडून मारला गेला हाता. त्याचा सूड उगविण्यासाठी हा हल्ला करण्यात आला, असे आरोपपत्रात सूचित करण्यात आले आहे. आपल्या पुतण्याच्या मृत्यूचा बदला घ्या, असे आवाहन करणारा अझरचा एक व्हिडीओही पुरावा म्हणून सादर करण्यात आला.
ईमेल व संदेश
राष्ट्रीय अन्वेषण प्राधिकरणाने पुरावे म्हणून अझर आणि अन्य दहशतवादी यांचे अनेक ईमेल्स व व्हॉटस् अप संदेश सादर केले आहेत. उमर फारूख याला हे संदेश देण्यात आले होते. पुलवामा घटनेनंतर आणखी एक दहशतवादी इब्राहिम अझर याचा मुलगाही चकमकीत मारला गेला होता.
उमर फारूख अफगाण प्रशिक्षित
2016 मध्ये उमर फारूख याला अफगाणिस्तान येथे प्रशिक्षण देण्यात आले होते. 2018 मध्ये त्यने काश्मीरमध्ये प्रवेश केला. अनेक दहशतवादी कारवायांमध्ये त्याचा सहभाग होता. पुलवामा हल्ल्यासाठी साधनसामग्री गोळा करण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपविण्यात आली होती. यावरून असे दिसते की पुलवामा हल्ल्याची योजना कित्येक महिने आधीच तयार करण्यात आली होती. जैशच्या ज्येष्ठ म्होरक्यांच्या सूचनेवरून हा हल्ला घडवून आणण्यात आला, असे आरोपपत्रात अन्वेषण प्राधिकारणाने अनेक पुराव्यांनिशी स्पष्ट केले आहे.
आणखी दहशतवादी समाविष्ट
पुलवामा हल्ल्यात मुदस्सीर अहमद, मोहम्मद उमर, सज्जाद अहमद भट आदी दहशतवाद्यांचाही समावेश होता. मात्र हे सर्व त्यानंतर काश्मीरमध्ये झालेल्या वेगवेळय़ा चकमकींमध्ये मारले गेले आहेत. यापैकी मोहम्मद उमर हा स्फोटक तज्ञ म्हणून ओळखला जात होता. आरोपपत्रात सर्व आरोपींच्या डिजिटल संवादांची मालिका सादर करण्यात आली असून ती स्पष्ट आहे, असे प्राधिकारणाने स्पष्ट केले. न्यायालयात आरोपी सुटणे निव्वळ अशक्य असल्याचेही सांगण्यात आले.
भक्कम पुराव्यांची मालिका
इ सर्व आरोपींविरोधात भक्कम डिजिटल पुरावा असल्याचे प्रतिपादन
ड मसूद अझरचा नातेवाईक मारला गेल्याने सूटापोटी पुलवामा हल्ला
ड मसूद अझरने आपल्या नातेवाईकांसमवेत रचला या हल्ल्याचा कट
ड 19 आरोपींपैकी 7 एनआयएच्या ताब्यात, 7 चकमनींमध्ये ठार