पुलाची शिरोली / प्रतिनिधी
पुलाची शिरोलीतील प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या दिड दोन महिन्यांपासून सर्दी खोकला आजारांवरील औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे सर्वसामान्य नागरीकांच्या आरोग्यावर परिणाम व त्यांची औषधांसाठी आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.
शिरोली, नागावसह परिसरात गेल्या कांही दिवसांपासून बदलत्या वातावरणाचा परिणाम सर्वसामान्य नागरीकांच्या आरोग्यावर झाला आहे. त्यामुळे सर्दी खोकला ताप अंगदुखी असे आजारी असलेल्या रुग्णांची येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी मोठी गर्दी होत आहे. पण तपासणी केली जाते पण गेल्या दिड दोन महिन्यांपासून खोकला आणि सर्दी वरील औषधे उपलब्ध नसल्यामुळे रिकाम्या हाताने परत पाठवले जात आहे. परिणामी भरमसाठ पैसै देवून दुकानातून औषधे खरेदी करावी लागत आहेत.
पुलाची शिरोलीतील सरकारी आरोग्य केंद्र हे पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील एकमेव आरोग्य केंद्र आहे. शिरोली, नागाव, टोप संभापूर, कासारवाडी हालोंडी व औद्योगिक वसाहत येथील प्रतिदिनी सुमारे दोनशे रुग्णांची प्राथमिक तपासणी व औषध उपचार केले जातात. तसेच महिना सुमारे तीस महिलांची प्रसुती (बाळंतपण) येथे होते.
सध्या वातावरणात झालेल्या बदलामुळे सर्दी खोकला ताप अंगदुखी डोकेदुखी अशा रुग्णांची संख्या येथे मोठ्या प्रमाणात आहे. या सर्व रुग्णांना उपचारासाठी डॉ. जेसिका अॅंन्ड्रोस या कार्यरत आहेत. व इतर सात जण वैद्यकीय मदतनीस म्हणून काम पहात आहेत. या आरोग्य केंद्राच्या अनुषंगाने टोप गावात उपकेंद्र निर्माण केले आहे. पण तेथे अद्याप वैद्यकीय मदतनीस नाही. मुख्य आरोग्य केंद्रात गेल्या दिड महिन्यांपासून औषध निर्माण अधिकारी व शिपाई या पदावर कोणाचीही नेमणूक करण्यात आलेली नाही. हि पदे रिक्त असल्याने सध्या अधिकारी व रुग्णांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.