पुलाची शिरोली/ वार्ताहर
दैनिक तरुण भारतच्या वृत्ताची दखल घेऊन पुलाची शिरोली येथील कार्यालयात तब्बल दोन वर्षांनी कायमस्वरूपी सहाय्यक अभियंता म्हणून अमीर मणेर यांची नेमणूक करण्यात आली आहे. याबद्दल ग्रामस्थांच्यातून तरुण भारतचे कौतुक होत आहे. शिरोलीचा कारभार प्रभारी अधिकार्याकडे अशा मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध झाले होते. याची दखल घेऊन वीज वितरण कंपनीकडून हालचाली सुरू झाल्या होत्या.
बापट कॅम्प कोल्हापूर येथील अतिरिक्त कार्यकारी अभियंता रविंद्र महाद्वार यांनी अचानक शिरोली कार्यालयास भेट देऊन आढावा घेतला होता.शिरोलीची सुमारे पन्नास हजार लोकसंख्या , जवळपास दहा हजार पर्यंत घरगुती ,व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांची संख्या तर समारे सव्वा कोटी रुपये मासिक महसूल आहे. अशा शिरोली कार्यालयाचा कार्यभार गेल्या दहा महिन्यापासून गांधीनगर येथील वीज वितरण कार्यालयाचे अभियंता अतुल सुतार यांच्याकडे होता. गांधीनगर येथील कार्यालयात कामाचा मोठा ताण असतानाही ते शिरोलीचा कारभार चालवत होते. पण त्यांना मर्यादा येत असल्याने शिरोली कार्यातील कामगारांच्यावर अंकुश ठेवणे अवघड व्हायचे.
त्यामुळे येथील कामगार घरगुती व शेतकऱ्यांच्या तक्रारीकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत असत. व मार्बल व्यावसायिक, हॉटेल व्यवसायिक , कारखानदार , गोडावून मालक, यांनाच प्राधान्य देत असल्याचे चित्र येथील ग्रामस्थांना पहावयास मिळत होते.याबाबत तरुण भारत मध्ये सविस्तर बातमी प्रसिद्ध झाल्यामुळे शहर मुख्य अभियंता श्री. एन.आर. गांधले , सहाय्यक अभियंता श्री . कवाळे यांनी तात्काळ हालचाली करून बापट कॅम्प येथील अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. महाद्वार यांना भेट देण्यास सांगितले. श्री . महाद्वार यांनी शिरोली कार्यालयाचा अहवाल वरिष्ठांना सादर केला होता. त्यानुसार हेरले येथील अमीर मणेर यांची नेमणूक करण्यात आली. याबद्दल ग्रामस्थांच्यातून समाधान व्यक्त होत आहे.
शिरोली सारख्या मोठ्या महसुली गावात कायमस्वरूपी कनिष्ठ अभियंता नाही. हे गावाचे ‘दुर्दैव्य म्हणायचे कि ग्राहकांची चेष्टा म्हणायची.’असे म्हणण्याची वेळ ग्रामस्थांच्यावर आली होती. पण सध्या तरी ती टळली आहे. १) आपणाकडे गांधीनगर व पुलाची शिरोलीचा अतिरिक्त कार्यभार होता . वरिष्ठांच्या आदेशानुसार आपण दोनही ठिकाणी ग्राहकांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे.
अतुल सुतार ( सहाय्यक अभियंता , गांधीनगर)
२) गेली दोन वर्षांपासून प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी तसेच दिपावली सण व पुढील हंगामात आमच्याकडून विज खंडीत होवू नये यासाठी योग्य कामासाठी पाठपुरावा सुरू केला आहे.
अमीर मणेर, सहाय्यक अभियंता पुलाची शिरोली.