पुलाची शिरोली / वार्ताहर
पुलाची शिरोली येथील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना विना कपात संपूर्ण पगार द्यावा. अन्यथा काम बंद आंदोलनाचा इशारा कॉ. गिरीष फोंडे यांनी शिरोली ग्रामपंचायतीला निवेदनाद्वारे दिला आहे.
शिरोली ग्रामपंचायतीने सर्व कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्याचा पगार प्रत्येकी चार हजार रुपये कपात करुन आदा केला आहे. याच्या विरोधात कोल्हापूर जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ (आयटक) या संघटनेने सोमवारी ग्रामविकास अधिकारी व्हि.बी. भोगण यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. शिरोली ग्रामपंचायतीमध्ये शासनाच्या नियमापेक्षा जादा कामगारांची नेमणूक करण्यात आली आहे. यामुळे शासनाच्या नियमानुसार पगार देण्यास अडचण आली आहे. त्यामुळे एप्रिल महिन्याचा पगार देताना प्रत्येक कामगारांच्या पगारात चार हजार रुपयांची कपात केली आहे.
याच्या विरोधात सोमवारी गिरीष फोंडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवेदन देऊन संपूर्ण पगार द्यावा अन्यथा कामबंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यासह प्रॉव्हीडंड फंडाची रक्कम बॅंकेत जमा केले नंतर तात्काळ पावती द्यावी, किमान वेतनाची आॅगष्ट २०२० पासुनचा फरक तात्काळ द्यावा, मास्क सॅनिटायझर, बुट व हातमोजे द्यावेत तसेच प्रत्येक महिन्याच्या सहा तारखेला पगार द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी शमुवेल कांबळे, स्नेहा शिंदे, प्रकाश सनदे आदि उपस्थित होते.