बाळ दगावल्याने तणावाचे वातावरण
पुलाची शिरोली / वार्ताहर
पुलाची शिरोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दारातच महिलेची प्रसूती झाली. पण निष्पाप बाळाला वैद्यकीय पथकाच्या बेजबाबदार व हलगर्जीपणामुळे जिव गमवावा लागला. असा आरोप नातेवाईकांनी करत ठिय्या आंदोलन करण्यात आले.हि घटना बुधवारी सकाळी घडली.
पुलाची शिरोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दारात साक्षी सतीश बेडेकर वय वर्षे २६, रा. आंबेडकर चौक, शिरोली माळवाडी. या महिलेची चारचाकी मध्येच प्रसूती होऊन बाळ दगावल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेबद्दल शिरोली ग्रामस्थ आणि नातेवाईकांकडून वैद्यकीय अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला. ज्या कर्मचाऱ्यांनी या महिलेला प्रसूतीसाठी वेळेवर रुग्णालयात दाखल करून घेतले नाही. अशा संबंधितांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अन्यथा बाळाचे शव ताब्यात घेणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला. यासाठी आरोग्य केंद्राच्या दारातच सर्वांनी ठिय्या आंदोलन केलं.
माहिती अशी की, गरोदर महिला साक्षी बेडेकर यांना प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर सकाळी पावणे नऊ वाजता प्राथमिक आरोग्य केंद्र, शिरोली याठिकाणी आणण्यात आलं. यावेळी त्यांना रुग्णालयात दाखल करून घेण्यास आरोग्य कर्मचाऱ्यांनी दिरंगाई केल्याने गरोदर महिलेला ज्या चारचाकी वाहनातून आणण्यात आले होते त्याच गाडीत तिची प्रसूती झाली. तत्पूर्वी १०७ नंबरला फोन करून रुग्णवाहिका मागविण्यात आली होती. त्यामधील डॉक्टरांनी प्रसूती नंतरची प्रक्रिया पूर्ण केली. मात्र त्याआधीच बाळ दगावलं होत.
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हलगर्जीपणा व दिरंगाई मुळे लहान बाळ दगावलं असा नातेवाईकांकडून आरोप करण्यात आला. आरोग्य केंद्राच्या हलगर्जीपणामुळ आमचं बाळ गेलय, ते परत मिळवून देणार का ? असा सवाल साक्षी यांच्या कुटुंबीयांनी उपस्थित केला. दरम्यान, काही काळ आरोग्य अधिकारी व नातेवाईक यांच्यात वाद झाल्याने तणावपूर्ण वातावरण बनलं होत. यावेळी शिरोली एमआयडीसी पोलीस घटनास्थळी दाखल होऊन संबंधितांची समजूत काढत होते. अखेर वैद्यकीय अधिकारी डॉ. जेसीका अँड्रोस यांनी प्रशासकीय स्तरावर संबंधितांची चौकशी करून कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
दरम्यान, वैद्यकीय अधिकारी डॉ. जेसीका अँड्रोस यांनी नातेवाईकांच्या आरोपाचे खंडन करत आईच्या अंगात रक्त कमी असल्याने मागील पंधरा दिवसांपासून तिच्यावर औषध उपचार सुरू होते, त्याचबरोबर बाळाच्या मेंदूला सूज असल्याने त्यांना पुढील उपचाराचा सल्ला यापूर्वीच नातेवाईकांना दिल्याचे सांगितले. आईची ही प्रसूतीची पहिलीच वेळ असल्याने, बाळ कमकुवत असल्याने व प्रि. डिलिव्हरी झाल्याने बाळ दगावल्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. तरी देखील उत्तरीय तपासणीचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूच खर कारण स्पष्ट होईल असे मत त्यांनी व्यक्त केले. नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार हलगर्जीपणा झाला असेल तर नक्की कारवाई करू असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी नातेवाईकांमध्ये सतीश बेडेकर, विद्या बेडेकर, रुपाली बेडेकर, विजय गोंदणे आदीसह लोकप्रतिनिधी उपस्थित होते.