पुलाची शिरोली / वार्ताहर
पुलाची शिरोली येथील एकास वाहन चोरी प्रकरणी शिरोली एमआयडीसी पोलिसांनी आज अटक केली. शैलेश संजय कांबळे ( वय २३, रा. माळवाडी, पुलाची शिरोली, ता. हातकणंगले ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्याकडून चोरीची महिंद्रा बोलेरो मॅक्सी ट्रक ( अंदाजे किंमत रुपये चार लाख तीस हजार ) पोलिसांनी जप्त केली.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी , शिरोली एमआयडीसी येथील बालाजी वे ब्रीज मागे असणार्या स्क्रॅप गोदामातून ऑगस्ट २०२१ मध्ये महिंद्रा बोलेरो मॅक्सी ट्रक चोरीस गेला होता. याबाबत शकील अब्दुल शेख ( रा. भादोले ) यांनी २१ ऑगस्ट २०२१ रोजी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सहायक पोलीस निरीक्षक राजेश खांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक प्रवीण काळे हे तपास करत होते. मिळालेल्या माहितीनुसार आज पोलिसांनी तासगाव ( जि. सांगली ) येथून संशयित आरोपी शैलेश कांबळेसह चोरीस गेलेले वाहन ताब्यात घेतले.