दोन कोटींचा अल्पकालीन आराखडा तयार, दीर्घकालीन आराखडाही होणार
सातारा / प्रतिनिधी
अपुरे शिक्षक, घटत चाललेली विद्यार्थी संख्या, पुर्णवेळ नसलेले प्राचार्य अन् त्यामुळे दुरवस्था झालेल्या पुसेगावच्या विद्यानिकेतनला गतवैभव मिळवून देण्यासाठी शिक्षण विभागाने कंबर कसली आहे. शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांच्या निर्देशानुसार माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर, डाएटचे प्राचार्य डॉ. रामचंद्र कोरडे, विद्यानिकेतनचे प्रभारी प्राचार्य बी. एम. वसेकर यांच्या उपस्थितीत या विद्यानिकेतनसाठी दोन कोटी रुपयांचा अल्पकालीन आराखडा तयार करण्यात आला असून जिल्हयातील नामवंत संस्थेतील शिक्षक प्रतिनियुक्तीवर या शाळेत पुर्णवेळ घेण्यात येणार आहेत.
राज्यात धुळे, अमरावती, औरंगाबाद, पुसेगाव (सातारा), केळापूर (यवतमाळ) अशा पाच ठिकाणी शासकीय विद्यानिकेतने आहेत. त्यांच्या समस्या जाणून घेऊन उपाययोजना करण्यासाठी शिक्षण आयुक्तांनी मागील मार्चमध्ये पुण्यात सर्व संबंधित अधिका-यांची बैठक घेतली होती. त्यास अनुसरून कोल्हापूर विभागीय शिक्षण उपसंचालक सत्यवान सोनवणे यांनी पुसेगाव विद्यानिकेतनबाबत त्रैमासिक बैठका घेण्याचे सूचित केले आहे.
विद्यानिकेतनच्या समस्या जाणून घेणेसाठी व त्यावर उपाययोजना करण्यासाठी शासकीय विद्यानिकेतन, पुसेगाव,ता.खटाव,जि.सातारा. येथे दि.१४.०७.२०२० रोजी सहविचार सभा आयोजित करण्यात आली. या सभेत ग्रामीण भागातील विद्यार्थी असल्यामुळे त्यांना आधुनिक, अद्ययावत डिजिटल क्लासरुम, डिजिटल फळे, प्रत्येक विद्यार्थ्यांना टॅब, प्रोजेक्टरद्वारा सादरीकरण करणे, आयटी लॅब नूतनीकरण, संगणक संख्या वाढविणे इ. सुविधा देण्याबाबत निर्णय घेण्यात आला. वंदना वळवी (गृहप्रमुख)यांनी आभार मानले. डॉ.रामचंद्र कोरडे, राजेश क्षीरसागर, शिक्षणाधिकारी(माध्य.)जि.प.सातारा यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहाकार्याबद्दल धन्यवाद दिले.