प्रतिनिधी /बेळगाव
महाराष्ट्राचं आणि समस्त मराठी जगताचं लाडकं व्यक्तिमत्त्व आदरणीय पु. लं. देशपांडे यांची 12 जूनला पुण्यतिथी झाली. त्याचे औचित्य साधून बुलकचे सदस्य मेधा मराठे, आरती आपटे, श्रीधर कुलकर्णी आणि चिन्मय शेंडे यांनी अभिवाचनाच्याद्वारे गोळाबेरीज हा एक कार्यक्रम लोकमान्य ग्रंथालयात सादर केला. त्यांच्यासोबत दृकश्राव्य माध्यमातून अनुष्का आपटे यांनी वीस बिऱहाडांच्या बटाटय़ाच्या चाळीतील प्रसंग सादर करून वाहव्वा मिळविली.
प्रारंभी बुलकचे अध्यक्ष चैतन्य हलगेकरांनी उपस्थितांचे स्वागत केले मध्यमवर्गीयाना सदैव आवडणारे पुलं, त्यांचं निरीक्षण, लेखन, मिश्कीलपणा आणि हसवत-हसवत डोळय़ांच्या कडा ओले करण्याची त्यांची किमया याविषयी मेधा मराठे यांनी प्रास्ताविकात विवेचन केले. त्याच्या पार्श्वभूमीवर आकाशवाणीच्या सुप्रसिद्ध संगीताच्या साहाय्याने वटवट केंद्राचा कार्यक्रम रंगला. मोठय़ा माणसांनी आपल्या आईला लिहिलेली भावस्पर्शी पत्रं, आजच्या परिस्थितीवर भाष्य करणारा राजा व प्रधानाचा संवाद, राहून गेलेल्या गोष्टी, निराश झालेल्या वैमानिक चंदू ठाकूरला लिहिलेलं जीवनाचा खरा अर्थ सांगणारं पत्र, आपली पत्नी सुनीता विषयीचा त्यांचा आदरभाव या साहित्यातून पुलं समर्थपणे उभे केले गेले. बुलकचे अध्यक्ष चैतन्य हलगेकर यांनी आभार मानले.