पुणे \ ऑनलाईन टीम
पुण्यामध्ये काही महिन्यांपुर्वी पूजा चव्हाण या तरुणीने आत्महत्या केली. या प्रकरणात तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच आरोप शिवसने नेते आणि माजी वनमंत्री राठोड यांच्यावर करण्यात येत आहे. आता याप्रकरणी संजय राठोड यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केली आहे.
पूजा चव्हाणच्या पालकांनी नोंदवलेल्या जबाबावरुन संजय राठोड यांना क्लीन चीट मिळाली असल्याची चर्चा होती. यावर चित्रा वाघ यांनी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन संजय राठोड यांच्यावर हल्लाबोल केला.
पूजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा या मागणीवर आम्ही ठाम आहोत. न्याय मिळण्यासाठी एफआयआर देखील झाला नाही आहे. याचे कारण सांगण्यात आले आहे की, पूजा चव्हाणच्या पालकांचा जबाब नोंदवण्यात आला असून त्यांचा कोणावरही आरोप नसल्यामुळे कोणावरही गुन्ह्याची नोंद करण्यात आली नाही. अनेक क्लीप्स, फोटोज, रेकॉर्डींग बाहेर आल्या त्या आवाजावरुन लहान पोरगंही सांगु शकते की तो आवाज कोणाचा तसेच आम्ही सांगतो आहे की, हा आवाज संजय राठोड यांचा असल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे