वृत्तसंस्था/ बार्बाडोस
गुरुवारपासून न्यूझीलंडमध्ये दोन प्रथमश्रेणी सामने होणार असून यासाठी विंडीज अ संघात निकोलस पूरनची निवड करण्यात आली आहे. विंडीज मंडळ भविष्यात कसोटी संघासाठी त्याचा विचार करणार असल्याचेच या निवडीतून दिसून येत आहे.
गेल्या दोन वर्षात 25 वर्षीय पूरनने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये तडाखेबंद फलंदाज म्हणून ओळख निर्माण केली आहे. वनडे कारकीर्द झोक्यात सुरू केल्यानंतर जगभरातील टी-20 क्रिकेट वर्तुळातही त्याने प्रभावी कामगिरी केली आहे. त्याची ही कामगिरी पाहून विंडीजच्या माजी खेळाडूंनी विशेषतः माजी गोलंदाज मायकेल होल्डिंग यांनी पूरनला कसोटीतही संधी दिली जावी, अशी शिफारस केली आहे. मात्र पूरनला केवळ तीन प्रथमश्रेणी सामने खेळण्याचा अनुभव आहे. त्रिनिदाद अँड टोबॅगो संघातून 2014 मध्ये त्याने हे सामने खेळले होते. आता त्याला या महिन्यात प्रथमच लाल चेंडूने खेळण्याची संधी मिळणार आहे. विंडीज अ संघाचे दोन सामने 3 डिसेंबर रोजी माऊंट माँगनुई व 11 डिसेंबर रोजी नेल्सन येथे होणार आहेत.
विंडीज अ संघ : फॅबियन ऍलेन, एन्प्रुमाह बॉनर, जोशुआ दा सिल्वा, ब्रेन्डॉन किंग, काईल मेयर्स, प्रेस्टन मॅकस्वीन, शाईन मोसली, निकोलस पूरन, रोवमन पॉवेल, रेमन रीफर, जेडेन सील्स, रोमारिओ शेफर्ड, ओशेन थॉमस, हेडन वॉल्श.