प्रतिनिधी/सांगली
पूरपट्ट्यातील 1 हजार मुलींना प्रत्येकी 50 हजारांची ठेव पावती देण्यात येणार आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज गुरुवारी या ठेवपावतींचे वितरण होणार आहे. दीपाली भोसले सय्यद फौडेशनच्यावतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी अकरा वाजता कवठेपिरान रोडवरील दीपलक्ष्मी मंगल कार्यालयात हा कार्यक्रम होणार आहे. केंद्रीय पंचायतराज मंत्री कपिल पाटील हेही या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.
राज्यपाल कोश्यारी गुरुवारी सकाळी 8.00 वाजता राजभवन मुंबई येथून प्रयाण करणार आहेत. सकाळी 8.45 वाजता शासकीय विमानाने त्यांचे कोल्हापूरकडे प्रयाण होईल. कोल्हापूर विमानतळावरुन सकाळी दहा वाजता सांगलीकडे रवाना होणार असून सकाळी अकरा वाजता माधवनगर सर्किट हाऊस येथे त्यांचे आगमन होईल. तेथून कसबे डिग्रज येथील कवठेपिरान रोडवर असणाऱया दीपलक्ष्मी मंगल कार्यालय येथे दीपाली भोसले-सय्यद धर्मादाय संस्थेमार्फत आयोजित सामूदायिक विवाह सोहळा आणि मुदत ठेव प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमास ते उपस्थित राहणार आहेत.
सुमारे एक तासाचा हा कार्यक्रम असून दुपारी साडेबारा वाजता राज्यपाल कोश्यारी हे पुन्हा माधवनगर रस्त्यावरील सर्किट हाऊस येथे येणार आहेत. तेथे दुपारी दोनपर्यंत राखीव असून दोन वाजता कोल्हापूरकडे रवाना होणार आहेत. तीन वाजता विमानाने कोल्हापूरहून ते मुंबईला रवाना होणार आहेत.
या संपूर्ण दौऱयात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या समवेत केंद्रीय पंचायतराज मंत्री कपिल पाटील असणार आहेत. त्यांच्यासह सर्वपक्षीय विविध नेत्यांनाही या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. राज्यपालांच्या या दौऱयाची प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. बुधवारी बंदोबस्त आणि दौरा मार्गावर रंगीत तालीम करण्यात आली.
सांगली-इस्लामपूर रोडवरील वाहतुकीत बदल
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत दीपलक्ष्मी मंगल कार्यालय, कवठेपिरान रोड, होणाऱया कार्यक्रमानिमित्त पोलिसांनी सागंली इस्लामपूर रस्त्यावरील वाहतुकीत बदल केला आहे. महामहीम राज्यपालांच्या वाहतुकीच्या ताफ्यास कोणताही अडथळा येऊ नये, तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने इतर कोणतीही वाहने त्यांच्या ताफ्यात येऊ नयेत यासाठी दक्षता घेण्यात आली आहे. गुरुवारी सकाळी 9 ते दुपारी एक वाजेपर्यंत लक्ष्मीफाटा ते कवठेपिरान रोडवरुन जाणारी वाहतूक समडोळी कमान येथून आनंदराज ढाब्यामार्गे सांगली-इस्लामपूरकडे वळविण्यात आली आहे.