अग्निशमन दल बनले सक्षम : आवश्यक साहित्य-सामग्री सज्ज
प्रतिनिधी/ बेळगाव
मागीलवषी संततधार पावसामुळे सर्वत्र पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. ठिकठिकाणी मदतीसाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते. पण अडकलेल्या नागरिकांना रबरी टय़ुबच्या बोटीच्या माध्यमातून मदत करताना अडथळय़ांना तोंड द्यावे लागले. त्यामुळे यंदा पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी अग्निशमन दलाच्या ताफ्यात दोन यंत्र बोटी दाखल झाल्या आहेत. त्यामुळे पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी अग्निशमन दल सक्षम बनले आहे.
मागीलवषी ऑगस्टमध्ये झालेल्या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. नदी काठासह शहरातदेखील सर्वत्र पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. अनेक गावे पुराच्या वेढय़ात अडकली होती. काही ठिकाणी अचानकपणे गावात पाणी शिरले होते. तसेच रस्त्यांवर पाणी आल्याने काही नागरिक शेतामध्ये अडकले होते. काही गावांचा संपर्क तुटला होता. अशावेळी अडचणीत सापडलेल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते. त्यावेळी अग्निशमन दलाच्या पथकाने विविध ठिकाणी मदत करून शेकडो नागरिकांची सुटका केली होती. पण अत्याधुनिक यंत्रोपकरणे नसल्याने अडचणीला सामोरे जावे लागले.
अग्निशमन दलाकडे रबरी टय़ुबच्या पायंडल बोटी उपलब्ध होत्या. या बोटीच्या आधारे नागरिकांना पुराच्या विळख्यातून बाहेर काढण्यात येत होते. पण चिकोडी येथे झाडावर अडकलेल्या नागरिकांची सुटका करताना पायंडल बोटीचा उपयोग होऊ शकला नाही. तसेच आंबेवाडी रस्त्यावर मार्कंडेय नदीचे पाणी आल्याने पुरात अडकलेल्या जनावर मालकाची सुटका करताना अडचणी निर्माण झाल्या होत्या. पुराच्या पाण्याचा प्रवाह जोरात असल्यामुळे पायंडल बोटीचा उपयोग झाला नाही. त्यामुळे लष्कराला पाचारण करून नागरिकांची सुटका करावी लागली. याची दखल घेऊन यंदा अग्निशमन दलाच्या ताफ्यात दोन यंत्र बोटींचा समावेश करण्यात आला आहे. या बोटी पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱयांनी दिली
25 होमगार्ड-अग्निशमन दलाचे 75 जवान तैनात
गेल्या पाच दिवसांपासून पावसाचा मारा वाढला आहे. ठिकठिकाणी नदी-नाल्यांमध्ये पाण्याची पातळी वाढली आहे. तसेच महाराष्ट्रातून पाणी सोडण्यात आल्याने पूरपरिस्थिती निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यामुळे अग्निशमन दल सज्ज असून 25 होमगार्ड आणि अग्निशमन दलाचे 75 जवान तैनात करण्यात आले आहेत. तसेच आवश्यक साहित्य व सामग्री सज्ज ठेवण्यात आली आहे.