राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप : आठ नव्या राष्ट्रीय विक्रमांची नोंद
वृत्तसंस्था/ ताश्कंद
भारताची वेटलिफ्टर पूर्णिमा पांडेने राष्ट्रकुल चॅम्पियनशिपमध्ये आठ राष्ट्रीय विक्रम नोंदवताना महिलांच्या 87 किलोवरील वजन गटात सुवर्णपदक पटकावले. तिने एकूण 229 (102 व 127) किलो वजन उचलत जेतेपद मिळवून पुढील वर्षी होणाऱया राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत थेट प्रवेश मिळविला.
पूर्णिमाने स्नॅच विभागात तसेच क्लीन व जर्क विभागात मिळून एकूण आठ नवीन राष्ट्रीय नोंदवले. पुरुष विभागात 109 किलो वजन गटात लवप्रीत सिंगने एकूण 348 (161 व 187) किलो वजन उचलत रौप्यपदक मिळविले. आशियाई युवा व ज्युनियर वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये कांस्य मिळविणाऱया लवप्रीतने स्नॅच विभागात तीन तर क्लीन व जर्कमध्ये प्रत्येकी एक नवीन राष्ट्रीय विक्रम नोंदवले. महिलांच्या 87 किलो वजन गटात अनुराधा पवनराजने कांस्य मिळविताना एकूण 195 (90 व 105) किलो वजन उचलले.
पुढील वर्षी बर्मिंगहॅम येथे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा होत असून वेटलिफ्टर्सना येथील स्पर्धेतून त्यासाठी थेट पात्रता मिळविता येत आहे. उर्वरित खेळाडूंना राष्ट्रकुल मानांकनानुसार पात्रता दिली जाणार आहे.