प्रतिनिधी / कोल्हापूर
पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर असलेल्या पूर्वपरवानगीच्या नियमामुळे कोल्हापूर महानगरपालिकेची शुक्रवारची सर्वसाधारण सभा होऊ शकली नाही. गुरूवारी महापौर निलोफर आजरेकर यांनी तहकूब केलेली ही सभा शुक्रवारी होणार होती. दरम्यान, शुक्रवारची सभा आणि 12 नोव्हेंबर होणारी शेवटची सभा अशा दोन्ही सभा एकत्रित घेण्यासाठी महापालिका प्रशासनाने जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱयांकडे अर्ज केला आहे.
पूर्वी जाहीर केलेल्या अजेंडÎानुसार महापालिकेची सर्वसाधारण सभा गुरूवार 5 नोव्हेंबर रोजी होणार होती. पण महापौर आजरेकर यांनी ही सभा तहकूब केली आणि 6 नोव्हेंबर रोजी घेण्याविषयी प्रशासनाला सूचना केल्या. दरम्यान, पदवीधर व शिक्षक मतदार संघाची आचारसंहिता लागू झाली. आचारसंहितेतील नियमानुसार अत्यावश्यक बाबींसाठी पूर्वपरवानगी घेऊन महापालिकेची सभा घेता येते. मात्र या सभेत शिक्षण, शैक्षणिक क्षेत्राची संबंधित मतदारांवर प्रभाव पडेल असे निर्णय, भूमिका घेता येत नाही. घोषणा, उद्घाटन करता येत नाही. गुरूवारी सायंकाळी महापालिकेच्या नगरसचिव विभागाने आयुक्तांच्या पत्राव्दारे जिल्हा निवडणूक अधिकाऱयांकडे अर्ज पूर्वपरवानगी मागण्याऐवजी मार्गदर्शन मागविणारा अर्ज केला. त्यानंतर शुक्रवारी सकाळपासून सायंकाळपर्यंत नगरसचिव मार्गदर्शनाच्या प्रतिक्षेत होते. मार्गदर्शन आले नाही. दरम्यान, शुक्रवारची सभा होऊ शकली नाही. आता 12 नोव्हेंबरला दोन्ही सभा घेण्यासाठी पूर्व परवानगी मागणारा अर्ज नगरसचिवांनी केला आहे. त्याला परवानगी मिळाल्यानंतरच सभा होणार आहे.