अण्णाभाऊ साठे जयंती व पूर्ववैमनस्यातून प्रकार, पाचजण जखमी
प्रतिनिधी
पलूस / कुंडल
पलूस तालुक्यातील दुधोंडी येथील वसंतनगर परिसरात रविवारी दुपारी दोन गटात झालेल्या धुमश्चक्रीत तिघांचा धारदार शस्त्राने भोसकून खून करण्यात आला. तर पाचजण गंभीर जखमी झाले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यावरून व पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. दोन्ही गटाकडून चाकू, गुप्ती, दगड व अन्य धारदार शस्त्रांचा वापर झाला असून पोलिसांनी महिलांसह सहा संशयितांना ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे दुधोंडी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण असून गावात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
अरविंद बाबुराव साठे (45), विकास आत्माराम मोहिते (32), सनी आत्माराम मोहिते (27) असे खून झालेल्यांची नावे आहेत. तर लखन मोहिते, स्वप्नील साठे, दिलीप साठे, संग्राम मोहिते, आकाश माहिते हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सांगली येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रविण विलास मोहिते, आदित्य विलास मोहिते, हिम्मत मधुकर मोहिते, विजय मधुकर मोहिते, किशोर प्रकाश मोहिते, वनिता विलास मोहिते, संगीता मधुकर मोहिते, मधुकर धोंडीराम मोहिते (सर्व रा. दुधोंडी) या संशयित आरोपींना कुंडल पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या गंभीर घटनेच्या पार्श्वभूमीवर दुधेंडी गावात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
सायंकाळी जिल्हा पोलिस प्रमुख दीक्षित गेडाम यांनी भेट देवून घटनास्थळाची पाहणी केली. दरम्यान या गंभीर घटनेमुळे दुधोंडी परिसर हादरला आहे. घटनास्थळावर दोन्ही गटातील संशयितांच्या दुचाकी गाडया, रक्ताचा सडा पडला होता
याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवार दि. 31 जुलै रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यावरून बैठकीत दोन गटात किरकोळ वाद झाला होता. या वादाची खोटी तक्रार कुंडल पोलिस ठाण्यात का दिली या कारणावरून रविवारी दुपारी मोहिते व साठे गटात पुन्हा वाद सुरू झाला. दुधोंडी-किर्लोस्करवाडी दरम्यानच्या वसंतनगर येथे दोन्ही गट आमने-सामने आल्यानंतर दोन्ही गटातील युवक एकमेकास तुम्हाला मस्ती आहे तुम्हाला जिवंत सोडणार नाही असे म्हणत मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यातील काही युवकांनी चाकू, गुप्ती, लोखंडी पाईप यासारख्या अन्य धारदार शस्त्रांनी अरविंद साठे, विकास मोहिते, सनी मोहिते यांच्यासह अन्य जणांवर हल्ला चढवला. मयत तिघांच्या पोटावर व छातीवर वर्मी वार केले. यामध्ये मयतासह जखमी रक्ताच्या थारोळयात पडले. हा प्रकार हल्लेखोरांच्या लक्षात येताच त्यांनी तेथून पळ काढला. सर्व जखमींना स्वप्नील साठे व त्यांच्या मित्रांनी दुचाकीवरून पलूस येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी नेले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना सांगली येथे उपचारासाठी हलवण्यात आले. अति रक्तस्रावामुळे तिघे मयत झाले. जखमीवर पोलिसांच्या सहकार्याने अनफळेत बैलगाडी शर्यतउपचारGपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती पोलिसांना समजताच पोलिसांनी तात्काळ घटनस्थळावर धाव घेतली. दोन महिलांसह सहा संशयित आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
मयतामध्ये मामा-भाचे
तिहेरी खून प्रकरणात एकाच कुटुंबातील सदस्यांचा समावेश असून मयत अरविंद साठे यांचे विकास मोहिते व सनी मोहिते हे त्यांचे भाचे आहेत. यातीलच एकासोबत साठे यांच्या मुलीचा विवाह झाला आहे.
तिहेरी खूनातील घटनाक्रम
शनिवारी जयंती साजरी करण्यावरून वादवादी
शनिवारी रात्रीच वादावादीची पोलिस ठाण्यात तक्रार
रविवारी सकाळी पोलिसांकडून दोन्ही गटांना समज
दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास पुन्हा वादावादी
अडीच वाजता वादावादीचे पर्यावसन मारामारीतून खुनात
तीन वाजता जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल
साडेतीन वाजता जखमींना सांगलीला हालवले
चार वाजता संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले
साडेचार वाजल्यापासून दुधोंडीत पोलिस बंदोबस्त
रात्री आठ वाजण्याच्या सुमारास जिल्हा पोलिस प्रमुख घटनास्थळार दाखल