येत्या सोमवारपासून लसीकरण मोहिमेची व्याप्ती वाढणार : आतापर्यंत 148 कोटींहून अधिक लसीचे डोस
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पुढील आठवडय़ापासून अधिक व्यापकपणे सुरू होणाऱया लसीकरण मोहिमेंतर्गत बुस्टर डोस देताना यापूर्वी जी लस घेतली असेल त्या कंपनीचा डोस लाभार्थींना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ज्या लोकांनी कोव्हॅक्सिनची लस घेतली आहे, त्यांना कोव्हॅक्सिनचाच बुस्टर डोस मिळेल, तर यापूर्वी कोव्हिशिल्ड लस घेणाऱयांना कोव्हिशिल्डचाच बुस्टर डोस देण्यात येईल, असे कोरोना टास्क फोर्सचे प्रमुख आणि निती आयोगाचे सदस्यडॉ. व्ही. के. पॉल यांनी स्पष्ट केले आहे.
देशात 10 जानेवारीपासून कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेले आरोग्य कर्मचारी, प्रंटलाईन वर्कर आणि विविध आजार असलेल्या 60 वर्षांहून अधिक वयाच्या लोकांना लसीचा बुस्टर डोस देण्यात येणार आहे. या माहिमेसाठी पुरेसा लससाठा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने लसपुरवठा करणाऱया कंपनींशी सल्लामसलत केली आहे. त्यानंतच बुस्टर डोस देताना यापूर्वी जी लस घेतली आहे, त्याच लसीचा बुस्टर डोस देण्यात येणार असल्याचे केंद्रानेही स्पष्ट केले आहे. कोरोना टास्क फोर्सचे प्रमुख आणि निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के पॉल यांनी यांनी याबाबत गुरुवारी अधिक माहिती दिली.
देशव्यापी लसीकरण मोहिमेंतर्गत आतापर्यंत कोरोना व्हायरस प्रतिबंधक लसींचे 148 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. बुधवारी एका दिवसात 91 लाख 25 हजार 99 डोस देण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार आतापर्यंत एकूण लसीकरणाचा आकडा 148 कोटी 67 लाख 80 हजार 227 डोस इतका झाला आहे.
15 ते 18 वयोगटातील 7.40 कोटी मुले
3 जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटातील मुलांसाठी लसीकरण सुरू करण्यात आले आहे. देशात या वयोगटातील 7.40 कोटी मुले असून त्यांना लसीकरण करायचे आहे, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
जानेवारी-फेबुवारीत सर्वाधिक संसर्गवाढ : शास्त्रज्ञांचा अंदाज
भारतात कोव्हिड-19 च्या तिसऱया लाटेचा पीकपॉईंट जानेवारी महिन्याच्या तिसऱया आठवडय़ात पाहायला मिळण्याचा अंदाज शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. भारतीय विज्ञान संस्था आणि भारतीय सांख्यिकी संस्था बेंगळूर यांनी केलेल्या संशोधनातून हा दावा करण्यात आला आहे. फेबुवारीतही हा संसर्ग कायम राहणार असून मार्च महिन्याच्या सुरुवातीला कोरोना संसर्गाची तिसरी लाट कमी होण्यास सुरुवात होण्याचा अंदाजही तज्ञांनी व्यक्त केला.