वृत्तसंस्था/ किन्शासा
कांगो या अफ्रिकेतील देशाच्या पूर्व भागात बेनी प्रदेशात दहशतवादी हल्ला झाला असून त्यात 25 लोकांचा बळी गेला आहे. लोक नववर्षाचा आनंद लुटण्यासाठी घराबाहेर सार्वजनिक स्थानी एकत्र आले होते. त्यांच्यावर दहशतवाद्यांनी अचानक अंदाधुंद गोळीबार केला. त्यात या बेसावध लोकांपैकी अनेकांचा मृत्यू झाला, अशी माहिती प्रशासनाने दिली. हा हल्ला डेमॉक्रेटिक फोर्सेस नामक दहशतवादी संघटनेने केला असावा असे अनुमान व्यक्त करण्यात आले. दहशतवाद्यांनी शेतात काम करणाऱया शेतकऱयांवरही गोळीबार केल्याचे सांगण्यात आले. अद्याप या हिंसाचाराची जबाबदारी कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही. मात्रग, ज्या संघटनेवर संशय आहे ती या देशातील नसून शेजाराच्या युगांडा देशातील असल्याचे सांगण्यात आले. कांगोच्या सरकारी सैनिकांनी गेल्यावर्षी या संघटनेविरोधात कारवाई सुरू केली होती. या कारवाईचा सूड म्हणून हे हत्याकांड घडविण्यात आले असावे, असेही सांगण्यात येत आहे