आयपीएल : दिल्ली कॅपिटल्सचा केकेआरविरुद्ध 7 गडी राखून शानदार विजय, पृथ्वी शॉ-शिखर धवनची 132 धावांची भरभक्कम सलामी निर्णायक, दिल्लीच्या गोलंदाजांचाही चतुरस्त्र मारा
अहमदाबाद / वृत्तसंस्था
पृथ्वी शॉ (41 चेंडूत 11 चौकार, 3 षटकारांसह 82) व शिखर धवन 46 (47 चेंडूत 4 चौकार, 1 षटकार) यांची झंझावाती शतकी भागीदारी आणि गोलंदाजांच्या चतुरस्त्र माऱयाच्या बळावर दिल्ली कॅपिटल्सने आयपीएल साखळी सामन्यात अपेक्षेप्रमाणे केकेआरचा 7 गडी राखून एकतर्फी फडशा पाडला आणि पूर्ण 2 गुण वसूल केले. या लढतीत शुभमन गिल व आंद्रे रसेलच्या फटकेबाजीनंतरही केकेआरला 6 बाद 154 धावांवर समाधान मानावे लागले. त्यानंतर दिल्लीने केवळ 3 गडय़ांच्या बदल्यात 16.3 षटकातच विजयाचे लक्ष्य गाठले.
दिल्लीचा सलामीवीर पृथ्वी शॉने शिवम मावीच्या डावातील पहिल्या षटकात 6 चौकार फटकावले आणि तेथून हा सामना दिल्लीच्या बाजूने झुकत गेला. शॉने तब्बल 11 चौकार व 3 उत्तुंग षटकारांसह 82 धावांची खेळी साकारली. शॉला सूर सापडल्याचे लक्षात आल्यानंतर धवनने त्याच्याकडे अधिक स्ट्राईक सोपवली आणि शॉ देखील केकेआरच्या जवळपास प्रत्येक गोलंदाजावर बरसत राहिला.
पृथ्वी शॉने 18 चेंडूत अर्धशतक साजरे केले आणि त्यानंतरही त्याचा धमाका सुरुच राहिला. दुसरीकडे, धवनने एक बाजू लावून धरताना खराब चेंडूंचा देखील उत्तम समाचार घेतला. कमिन्सने या दोन्ही सलामीवीरांना बाद केले. पण, तोवर बराच उशीर झाला होता. रिषभ पंत देखील कमिन्सचेच आणखी एक सावज ठरला. पुढे स्टोईनिसने (नाबाद 6) विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. हेतमेयर शून्यावर नाबाद राहिला.
रसेलची फटकेबाजी
आंद्रे रसेलने फटकेबाजी करण्यापूर्वी केकेआरला आघाडीवीरांच्या आणखी एका हाराकिरीचा सामना करावा लागला. रसेलने 27 चेंडूत नाबाद 45 धावा फटकावल्या. त्या बळावर केकेआरला 20 षटकात 6 बाद 154 धावांपर्यंत पोहोचता आले. प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळालेल्या केकेआरने 10 षटकाअखेर 1 बाद 69 अशी सुरुवात केली होती. पण, 13 व्या षटकाअखेर त्यांची 5 बाद 82 अशी अचानक पडझड झाली. नंतर रसेलच्या फटकेबाजीमुळे ते दीडशेहे धावांचा टप्पा सर करु शकले. दिल्ली कॅपिटल्सतर्फे अक्षर पटेल व ललित यादव यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. फॉर्मसाठी झगडत आलेल्या सलामीवीर शुभमन गिलने येथे 38 चेंडूत सर्वाधिक 43 धावांचे योगदान दिले. त्याच्या खेळीत 3 चौकार व एका षटकाराचा समावेश राहिला.
कोलकाता नाईट रायडर्सने या सामन्यात पॉवर प्लेच्या 6 षटकात 1 बाद 45 धावा केल्या. अक्षरच्या डावातील चौथ्या षटकात नितीश राणा यष्टीचीत झाला. गिलने मात्र जम बसल्यानंतर इशांत शर्मा व अक्षरचाही उत्तम समाचार घेतला. राहुल त्रिपाठी 10 व्या षटकात बाद झाला आणि त्यानंतर केकेआरचा डाव अचानक गडगडला. इयॉन मॉर्गन व सुनील नरेन हे दोन्ही फलंदाज खातेही न उघडता 3 चेंडूंमध्येच बाद झाले. दुखापतग्रस्त अमित मिश्राच्या जागी संघात आलेल्या ललित यादवने हे दोन्ही बळी घेत केकेआरच्या जखमेवर आणखी मीठ चोळले. मॉर्गनने लाँगऑफवरील स्टीव्ह स्मिथकडे झेल दिला तर नरेनचा त्रिफळा उडाला. या हंगामात 7 डावात अद्याप एकही अर्धशतक झळकावू न शकलेल्या शुभमनने 43 धावांवर अवेश खानच्या गोलंदाजीवर स्मिथकडे झेल दिला.
सलामीवीर पृथ्वी शॉने फटकावले 6 चेंडूत 6 चौकार!
दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर पृथ्वी शॉने या सामन्यात शिवम मावीच्या डावातील पहिल्याच षटकात सलग 6 चौकार फटकावले व 24 धावांची आतषबाजी केली. मावीने या षटकातील पहिला चेंडू वाईड टाकला होता. यामुळे, पहिल्या षटकाअखेर दिल्लीच्या खात्यात बिनबाद 25 धावा नोंदवल्या गेल्या.
धावफलक
केकेआर : नितीश राणा यष्टीचीत पंत, गो. पटेल 15 (12 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), शुभमन गिल झे. स्मिथ, गो. अवेश खान 43 (38 चेंडूत 3 चौकार, 1 षटकार), राहुल त्रिपाठी झे. ललित यादव, गो. स्टोईनिस 19 (17 चेंडूत 2 चौकार), इयॉन मॉर्गन झे. स्मिथ, गो. ललित यादव 0 (2 चेंडू), सुनील नरेन त्रि. गो. ललित यादव 0 (1 चेंडू), आंद्रे रसेल नाबाद 45 (27 चेंडूत 2 चौकार, 4 षटकार), दिनेश कार्तिक पायचीत गो. पटेल 14 (10 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), पॅट कमिन्स नाबाद 11 (13 चेंडूत 1 चौकार). अवांतर 7. एकूण 20 षटकात 6 बाद 154.
गडी बाद होण्याचा क्रम
1-25 (नितीश राणा, 3.4), 2-69 (राहुल त्रिपाठी, 9.3), 3-74 (मॉर्गन, 10.2), 4-75 (सुनील नरेन, 10.4), 5-82 (शुभमन, 12.6), 6-109 (दिनेश कार्तिक, 16.2).
गोलंदाजी
इशांत शर्मा 4-0-34-0, कॅगिसो रबाडा 4-0-31-0, अक्षर पटेल 4-0-32-2, अवेश खान 4-0-31-1, ललित यादव 3-0-13-2, मार्कस स्टोईनिस 1-0-7-1.
दिल्ली कॅपिटल्स : पृथ्वी शॉ झे. राणा, गो. कमिन्स 82 (41 चेंडूत 11 चौकार, 3 षटकार), शिखर धवन पायचीत गो. कमिन्स 46 (47 चेंडूत 4 चौकार, 1 षटकार), रिषभ पंत झे. मावी, गो. कमिन्स 16 (8 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), मार्कस स्टोईनिस नाबाद 6 (3 चेंडूत 1 चौकार), शिमरॉन हेतमेयर नाबाद 0 (1 चेंडू). अवांतर 6. एकूण 16.3 षटकात 3 बाद 156.
गडी बाद होण्याचा क्रम
1-132 (धवन, 13.5), 2-146 (15.2), 3-150 (रिषभ, 15.5).
गोलंदाजी
शिवम मावी 1-0-25-0, वरुण चक्रवर्ती 4-0-34-0, प्रसिद्ध कृष्णा 3.3-0-36-0, सुनील नरेन 4-0-36-0, पॅट कमिन्स 4-0-24-3.