रेल्वेस्थानकापासून वडगावपर्यंत काढली विजयी मिरवणूक, नागरिकांनी दिल्या शुभेच्छा
प्रतिनिधी /बेळगाव
सुपर डान्सर या रिऍलिटी शोमध्ये उपविजेता ठरलेल्या वडगावच्या पृथ्वीराज केंगारीचे रविवारी सकाळी जल्लोषात स्वागत करण्यात आले. रेल्वे स्थानकावर दाखल होताच नागरिकांनी पृथ्वीराजला उचलून घेऊन आनंद व्यक्त केला. पृथ्वीराजला शुभेच्छा देण्यासाठी त्याचे शेकडो चाहते रेल्वे स्थानक परिसरात दाखल झाले होते. रेल्वे स्थानकापासून वडगाव येथील त्याच्या घरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली.
आपल्या नृत्याच्या जोरावर पृथ्वीराजने उपविजेतेपदावर नाव कोरले. बेळगाव तसेच कर्नाटकातून या स्पर्धेसाठी निवड झालेला तो एकमेव होता. उपविजेता ठरलेल्या पृथ्वीराजचे बेळगावमध्ये जल्लोषपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. रेल्वे कर्मचाऱयांतर्फे मुख्य तिकीट निरीक्षक सुनिल आपटेकर, प्रभाकर देसाई, रमेश मिना यांनी स्वागत केले. तर वीर मदकरी गर्जना संघाचे राज्याध्यक्ष आनंद शिरूर यांनी पृथ्वीराजचे स्वागत केले. याचसोबत वडगाव, खासबाग, शहापूर या परिसरातील नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
बेळगावचे नाव उज्ज्वल करणार : पृथ्वीराज केंगारी
आई-वडिलांनी लहानपणापासून डान्सला प्रोत्साहन दिले. माझे गुरू किरण कांबळे यांनी माझ्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली आहे. त्यामुळेच मी आज हे यश मिळवू शकलो. बेळगावच्या लोकांचे मी आभार मानतो. त्यांनी मोठय़ा संख्येने मला मतदान करून उपविजेतेपदापर्यंत पोहोचविले. यापुढेही बेळगावचे नाव उज्ज्वल होईल असे काम करत राहू असा विश्वास त्याने तरुण भारतशी बोलताना व्यक्त केला.
पृथ्वीराजमुळे पाहिली मुंबई कोंगारी कुटुंब हे वडगाव येथील मलप्रभा नगर येथे वास्तव्याला आहे. वडील अशोक यंत्रमागावर काम करतात. तर आई राजेश्वरी गृहिणी आहे. सर्वसामान्य असणाऱया कुटुंबाने यापूर्वी कधीच मुंबईला जाण्याचे स्वप्नही पाहिले नव्हते. परंतु पृथ्वीराजने मिळविलेल्या यशामुळे त्यांना मुंबईला जाता आले. अनेक मोठय़ा कलाकारांशी जवळून बोलता आले. त्यामुळे आमच्या मुलामुळे आमची ओळख झाली असे सांगताना पृथ्वीराजच्या आईला गहीवरून आले.