माजगाव प्रतिनिधी
६४ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अटीतटीच्या अंतिम लढतीत पै.पृथ्वीराज बाबासाहेब पाटील याने प्रवेश केल्याने देवठाणे (ता.पन्हाळा) येथील ग्रामस्थांची उत्कंठा शिगेला पोहचली होती. पृथ्वीराजने मुंबईचा पै.विशाल बनकर याच्यावर विजय मिळवताच पृथ्वीराजच्या मूळ गावी गावकऱ्यांनी फटाके उडवून, गुलालाची उधळण व साखर पेढे वाटून एकच जल्लोष केला. महिला व ग्रामस्थांच्या डोळ्यात आनंद अश्रू आले.
” महाराष्ट्र केसरी कुस्ती अंतिम स्पर्धेत पृथ्वीराजने मिळवलेला हा विजय आम्हा सर्व ग्रामस्थांसाठी अभिमानस्पद आहे. पृथ्वीराज नक्कीच ऑलिंपिक विजेता होईल असा आमचा विश्वास आहे. तो जागतिक विजेता व्हावा यासाठी आमच्या शुभेच्छा आहेत.” असे मत देवठाणेच्या सरपंच सरिता कांबळे यांनी व्यक्त केलं