वनडे संघात दुखापतग्रस्त रोहित शर्माच्या जागी मयांक अगरवालला संधी
हॅमिल्टन / वृत्तसंस्था
न्यूझीलंडविरुद्ध दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी सलामीवीर पृथ्वी शॉचे संघात पुनरागमन झाले असून वनडे संघात दुखापतग्रस्त रोहित शर्माची जागा मयांक अगरवाल घेत आहे. मंगळवारी या दोन्ही संघांची अधिकृत घोषणा केली गेली.
पृथ्वी शॉने यापूर्वी ऑक्टोबर 2018 मध्ये भारतीय संघातर्फे शेवटचे प्रतिनिधीत्व केले होते. यंदा भारत-न्यूझीलंड यांच्याविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका दि. 21 फेब्रुवारीपासून खेळवली जाणार आहे.
बुधवारपासून दोन्ही संघ 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत आमनेसामने भिडत असून त्यात रोहित शर्माची जागा मयांक अगरवाल घेत आहे. केएल राहुल मध्यफळीत फलंदाजीला उतरण्याचे संकेत आहेत. शॉला यापूर्वी 8 महिन्यांच्या बंदीला सामोरे जावे लागले. पण, पुनरागमनात त्याच्या खेळातील आक्रमकता जैसे थे असल्याचे दिसून आले आहे. शॉ अ संघासमवेत दोन आठवडय़ांपासूनच न्यूझीलंडमध्ये असून याचाही त्याला लाभ होऊ शकतो. दौऱयातील पहिल्या डावात न्यूझीलंड एकादशविरुद्ध त्याने 150 धावांची तडाखेबंद खेळीही यापूर्वी साकारली आहे.
भारताचा कसोटी संघ : विराट कोहली (कर्णधार), मयांक अगरवाल, पृथ्वी शॉ, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, जसप्रित बुमराह, उमेश यादव, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, इशांत शर्मा (तंदुरुस्ती अहवालावर अवलंबून).