वृत्तसंस्था/ मुंबई
दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर पृथ्वी शॉ याला जोराचा ताप आल्याने त्याला सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र त्याची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्याला याआधीचा शेवटचा सामनाही हुकला होता.
‘पृथ्वीची प्रकृती सध्या सुधारत असून त्याला तीव्र ताप आल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. मात्र त्याची आरटी-पीसीआर चाचणी निगेटिव्ह आली असल्याने काळजीचे कारण नाही,’ असे बीसीसीआयच्या वरिष्ठ सूत्राने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. पृथ्वीने स्वतः हॉस्पिटलमधूनच इन्स्टाग्राम पेजवर यासंदर्भात पोस्ट टाकली असून आपल्या तब्येतीत सुधारणा होत असल्याचे त्याने त्यात म्हटले आहे. चाहत्यांच्या शुभेच्छाबद्दलही त्याने आभार मानले आहेत. रविवारी दिल्ली संघातील एक नेटबॉलर कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने चेन्नईविरुद्ध होणाऱया सामन्याआधी पूर्ण संघालाच आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले होते.