वृत्तसंस्था / वॉशिंग्टन :
अमेरिकेची आरोग्य यंत्रणा सेंटर फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने (सीडीसी) कोरोना विषाणूसंबंधी नवी अद्ययावत माहिती प्रकाशित केली आहे. सीडीसी संकेतस्थळानुसार कोरोना विषाणू मुख्यत्वे मानवातून मानवात फैलावतो. हा संसर्ग कुठल्याही पृष्ठभागाला स्पर्श केल्याने सहजपणे होत नसल्याचे म्हणत सीडीसीने कुठल्या स्रोतापासून अधिक धोका नाही हे देखील स्पष्ट केले आहे.
कुठलाही दूषित पृष्ठभाग आणि बाधित प्राणी विषाणू फैलावाचे मुख्य स्रोत असल्याची शक्यता फारच कमी आहे. नवी माहिती अंतर्गत आढावा आणि चाचण्यानंतर प्रकाशित करण्यात आल्याचे सीडीसीच्या प्रवक्त्या क्रिस्टन नॉर्डलंड यांनी सांगितले आहे.
विषाणूयुक्त पृष्ठभागाला स्पर्श केल्यावर स्वतःचे नाक, तोंडाला स्पर्श करून एखादा व्यक्ती कोविड-19 संसर्गाने बाधित होऊ शकतो, असे सीडीसी संकेतस्थळाच्या जुन्या तपशीलात म्हटले गेले होते.
सीडीसीच्या संकेतस्थळात करण्यात आलेल्या बदलांमुळे तज्ञ चिंतेत आहेत. या महामारीत सरकारकडून स्पष्ट संदेश न पोहोचविणे हे देखील त्रासाचे कारण ठरत असल्याचा आरोप कोलंबिया युनिव्हर्सिटी मेलमॅन स्कुल ऑफ पब्लिक हेल्थमधील वायरोलॉजिस्ट अँजेला रासमुसेन यांनी केला आहे.
सीडीसी हे जगातील अग्रगण्य आरोग्य यंत्रणा मानली जाते. सीडीसीचे निर्देश अन् सूचना अन्य देशांसाठीच मार्गदर्शक ठरत असतात. सीडीसीने कोरोनासंबंधी संशोधनाला चालना देत महत्त्वाच्या सूचना प्रसारित केल्या आहेत.