मागील आठवडय़ात झाली होती अशीच दुर्घटना
वृत्तसंस्था / लेह
लडाखमधील युद्धाभ्यासादरम्यान एका पॅरा कमांडोचा पॅराशूट न उघडल्याने मृत्यू झाला आहे. नायक सूरज पाल हे आगरा येथील पॅरा-ब्रिगेडमध्ये तैनात होते. सूरज पाल यांची टीम पर्वत प्रहार युद्धाभ्यासासाठी लेह येथे पोहोचली होती. मागील 12 दिवसांमध्ये लेह सेक्टरमध्ये पॅराशूट न उघडल्याने कुठल्याही सैनिकाचा मृत्यू होण्याची ही दुसरी घटना आहे.
पॅरा कमांडोच्या मृत्यूप्रकरणी भारतीय सैन्याने दुःख व्यक्त केले आहे. या दुःखाच्या क्षणात सैन्यप्रमुख जनरल मनोज पांडे आणि सैन्याचे सर्व अधिकारी तसेच सैनिक हे सूरज पाल यांच्या कुटुंबाबद्दल संवेदना व्यक्त करत आहेत असे सैन्याकडून म्हटले गेले.
मागील 15 दिवसांपासून लेह-लडाखमध्ये 14 वी कोअर आणि मथुरा येथील वन स्ट्राइक कोअरचा पर्वत प्रहार युद्धाभ्यास सुरू होता. या युद्धाभ्यासात आगरा येथील पॅरा-ब्रिगेडने भाग घेतला होता. या युद्धाभ्यासादरम्यान 10 सप्टेंबर रोजी पॅरा-ब्रिगेडच्या ट्रूपर्सना आकाशातून पॅरा-जम्प करायचे होते. पॅरा-जम्पदरम्यान सूरज पाल यांचा पॅराशूट न उघडल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.
नायक सूरज पाल हे उत्तरप्रदेशच्या हाथरसचे रहिवासी होते. सैन्यप्रमुख जनरल मनोज पांडे हे शनिवारी लेह सेक्टरमध्ये होते आणि त्यांनी पर्वत प्रहार युद्धाभ्यासाची समीक्षा केली होती. यापूर्वी 29 ऑगस्ट रोजी रेड-हंट सरावावेळी नायब सुभेदार हरिवीर सिंह यांचाही अशाच प्रकारे मृत्यू झाला होता.