संयुक्त राष्ट्र महासचिवांकडून आनंद व्यक्त
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
पॅरिस हवामान बदल विषयक करारातून बाहेर पडल्याच्या 107 दिवसांनी अमेरिका पुन्हा एकदा अधिकृतपणे यात सामील झाला आहे. संयुक्त राष्ट्रसंघ महासचिव अँटोनियो गुतेरेस यांनी याला जगासाठी ‘आशेचा दिवस’ ठरविले आहे. चार वर्षांपर्यंत एका प्रमुख सदस्याच्या अनुपस्थितीने या ऐतिहासिक कराराला कमकुवत केले होते, असे गुतेरेस यांनी म्हटले आहे.
अमेरिकेचे 46 वे अध्यक्ष जो बायडेन यांनी पदभार हाती घेताच डोनाल्ड ट्रम्प यांचे निर्णय पालटवत 15 कार्यकारी आदेशांवर स्वाक्षरी केली होती. यात पॅरिस करारात पुन्हा सामील होण्याचा निर्णय होता. अध्यक्षपदी असताना ट्रम्प यांनी मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये औपचारिक स्वरुपात अमेरिकेला पॅरिस हवामान करारातून वेगळे केले होते.
2021 हे मेक इट किंवा ब्रेक इट वर्ष आहे. आतापर्यंत दर्शविण्यात आलेल्या प्रतिबद्धता पुरेशा नाहीत. प्रत्येक ठिकाणी इशाऱयाचे संकेत मिळत आहेत. कर्बवायूची पातळी उच्चांकी स्तरावर आहे. प्रत्येक क्षेत्रात वणवे, पूर आणि हवामानाच्या घटना विक्राळ होत आहेत. देशांनी पावले न उचलल्यास चालू शतकात 3 पेक्षा अधिक अंश तापमानवृद्धीला सामोरे जावे लागू शकते असे गुतेरेस यांनी म्हटले आहे.
भारतासह सर्व 17 प्रमुख कर्बवायू उत्सर्जक देशांनी उत्सर्जनात कपात करण्याची गरज असल्याचे उद्गार हवामान बदलविषयक अमेरिकेचे विशेष प्रतिनिधी जॉन केरी यांनी काढले आहेत.