वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जागतिक पातळीवरील न्यू कार असेसस्मेंट प्रोग्रॅम (एनसीएपी) यांनी निस्सान मॅग्नाइट आणि रेनॉ किगरला सेफ्टी रेटिंग सादर केले आहे. भारतामध्ये विक्रीत ही दोन मॉडेल्स लोकप्रिय मॉडेल म्हणून ओळखली जातात. मॅग्नाइटने एसयूव्ही सेगमेंटमध्ये कमी किमत ठेवत आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.
काय आहे एनसीएपी क्रॅश टेस्ट?
कारची सेफ्टी रेटिंग ः एनसीएपीकडून जवळपास सर्व कंपन्यांच्या कार्सची क्रॅश टेस्ट घेतली जाते. सर्व कंपन्या आपल्या कारचे प्रत्येक मॉडेल आणि मॉडेलवरील विविध सेफ्टी फिचर्स देत असतात. यामध्ये एअरबॅग्स, एबीएस, इबीडी, सेफ्टी बेल्ट, बॅक सेंसर, कॅमेरा, स्पीड अलर्ट आदीचा समावेश यामध्ये होतो.
निस्सान मॅग्नाइटला क्रॅश टेस्टमध्ये 4 स्टार रेटिंग
निस्सानने आपल्या मॅग्नाइट एसयूव्हीला 2020 मध्ये सादर केले होते. आपल्या सेगमेंटमध्ये कमी किमतीमुळे ही गाडी सर्वाधिक पसंतीस उतरली आहे. याची टक्कर ही हय़ुंडाई क्रेटा, मारुती विटारा ब्रिझा, किया सेल्टॉस, टाटा नेक्सन यासारख्या एसयूव्हीमध्ये होणार आहे. क्रॅश टेस्टमध्ये मॅग्नाइटला ऍडल्ट प्रोटेक्शन टेस्टमध्ये चार स्टार मिळाले आहेत. या चाचणीत 17 मध्ये 11.85 पॉईंट मिळाले आहेत. दुसऱया बाजूला किगरलाही क्रॅश टेस्टमध्ये 4 स्टार रेटिंग मिळाले आहे.