मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांचे स्पष्टीकरण
प्रतिनिधी/ बेंगळूर
भाजप हायकमांडकडून अद्याप कोणताही संदेश आपल्याला आलेला नाही. सोमवारपर्यंत वाट पाहिन. राज्यात भाजप सत्तेवर येऊन सोमवारी दोन वर्षे पूर्ण होत असल्याने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर काय होईल, ते पहावे लागणार असून हायकमांडच्या निर्णयाला आपण कटिबद्ध आहे. राजीनामा देण्याची सूचना केल्यास तात्काळ राजीनामा देण्यास तयार आहे, असे मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी स्पष्ट केले. रविवारी बेळगाव दौरा आटोपून बेंगळुरात परतल्यानंतर पत्रकारांशीत ते बोलत होते.
मुख्यमंत्री येडियुराप्पा पुढे म्हणाले, अद्याप कोणताही संदेश आलेला नाही. भाजप सत्तेवर येऊन दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सोमवारी सकाळी आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी बंगळूरला परतले आहे. सोमवारी कारवार जिल्हय़ातील पूरस्थिती पाहण्यासाठी जाणार होतो. परंतु, सदर कार्यक्रमामुळे हा दौरा रद्द केला आहे. तसेच सोमवारीच दौऱयाबाबत निर्णय घेतला जाईल. आतापर्यंत भाजप हायकमांडकडून कोणताच संदेश आलेला नाही. आल्यानंतर तात्काळ पदाचा राजीनामा देऊन पक्ष संघटनेसाठी कार्य करणार आहे, असे त्यांनी सांगितले.